गेल्या अनेक दिवसांपासून राणा दाम्पत्य महाराष्ट्र राजकारणात चांगलेच चर्चेत आहे. आधी शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य हा वाद, तर आता राज ठाकरे विरुद्ध राणा दाम्पत्य असा वाद सुरू आहे. मात्र, आता राणा दाम्पत्याबाबत एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती मिळत आहे.
एका मुस्लिम धर्मगुरूकडून फोन कॉल आल्याची माहिती नवनीत राणा यांनी पोलिसांना दिली आहे. हनुमान चालिसा म्हटल्यास तुम्हाला ठार मारू अशी धमकी त्याने दिली असल्याचे नवनीत राणा यांनी पोलिसांना सांगितले आहे. नवनीत राणा यांनी नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार केली आहे.
नवनीत राणा यांच्या तक्रारी नंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, नवनीत राणा या हनुमान चालिसा पठणावरून वादात सापडल्या आहेत. मातोश्री समोर हनुमान चालिसा म्हणण्याचे चॅलेंज दिल्यामुळे राणा दाम्पत्य एकदा तुरुंगात देखील जाऊन आले आहेत.
नवनीत राणा यांना धमकी येण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर अॅसिड फेकण्याची अज्ञाताने धमकी दिली असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता. आता ही आणखी एक धमकी त्यांना देण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राणा दांपत्य पहिल्यांदाच विदर्भाचा दौरा करणार आहेत. 28 मे रोजी ते नागपूरला जाणार आहेत. नागपुरात गेल्यानंतर ते पून्हा राम मंदिरात हनुमान चालिसा पठण आणि हनुमान आरती व महापूजा करणार आहेत. त्यानंतर ते अमरावतीला जातील अशी माहिती मिळाली आहे.
माहितीनुसार, 28 मे रोजी नागपुरात नवनीत राणा यांच्या हनुमान आरतीच्या वेळेस राष्ट्रवादी कॉंग्रेस महागाई विरोधात आंदोलन करणार आहे. नवनीत राणा ज्या मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्याचं रामनगर हनुमान मंदिरात राष्ट्रवादी कॉंग्रेस महागाईविरोधात देखील आंदोलन करणार आहेत.