Share

”हात नाही तोडता आला तर पाय तोडा, दुसऱ्या दिवशी टेबल जामीन करून देतो”

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली, आणि भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं. याचा शिवसेनेला मोठा धक्का बसला. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांविरोधात आक्रमक होत शिवसैनिकांना सोबत राहण्याचे आवाहन केलं.

माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी देखील आक्रमक होत बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना इशारा दिला. शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर वारंवार निशाणा साधला. मात्र, आता शिंदे गटातील आमदारांकडूनही प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

शिंदे गटातील बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांनी दहिसर कोकणी पाडा बुद्धविहार येथे एका कार्यक्रमात शिवसेनेला इशारा दिला आहे.  या कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार प्रकाश सुर्वे यांनी आक्रमक होत चितावणीखोर व प्रक्षोभक भाषण केले आहे.

प्रकाश सुर्वे म्हणाले, आपण गाफिल राहायचं नाही. यांना यांची जागा दाखवून द्यायची. कुणी आरे केले तर त्याला कारे करा आणि ठोकून काढा प्रकाश सुर्वे इथे बसला आहे. हात नाही तोडता आला तर पाय तोडा. दुसऱ्या दिवशी टेबल जामीन करुन देतो.

प्रकाश सुर्वे यांच्या या आक्रमक भाषणाची दखल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या शिवसेनेने घेतली. ठाकरे गटातील शिवसैनिकांनी प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात गु्न्हा दाखल करुन त्यांच्याविरोधात कडक कारवाई करावी अशीही मागणी केली आहे.

दरम्यान, शिंदे आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकमेकांवर केले जाणारे आरोप-प्रत्यारोप वाढत जाऊन आता त्याची जागा हिंसेने घेतल्याचं समोर येत आहे. एकमेकांच्या विरोधात धमक्या दिल्या जात आहेत.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now