राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होताना शिंदे गटात गेलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता सरकार स्थापन होऊन काही दिवस होताच उद्धव ठाकरेंवर होणारी टीका सहन करणार नाही, असे या आमदारांनीच ठणकावून सांगितलं.
विशेषतः या आमदारांचा राणे कुटुंब आणि किरीट सोमय्या यांच्या दिशेने रोख असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राणेंनी उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर बोलू नये, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला होता. त्यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र तथा भाजप नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
निलेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंना एवढं मानता तर त्यांना सोडून का आलात? दीपक केसरकरांच्या मतदारसंघात काय अवस्था आहे हे मला चांगलं माहिती आहे. एकही नगरपालिका, नगरपंचायच, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपचायत त्यांच्याकडे नाही. सगळ्या भाजपाकडे आहेत. शिंदेंमुळे केसरकरांना राजकीय कुबड्या मिळाल्या आहेत.
तसेच म्हणाले, हा माणूस उद्या काहीही बोलेल आणि आम्ही ते ऐकून घेणार एवढे काही दीपक केसरकर मोठे नाहीत. ते म्हणतात नारायण राणेंनी बोलण्याची शैली बदलावी. हे केसरकर आम्हाला बोलणार? ज्यांच्या मतदारसंघात २५ माणसंही त्यांना विचारत नाहीत, त्यांना आम्ही का विचारणार?
दीपक केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. त्यामुळे भाजपाच्या लोकांविषयी बोलण्याचा अधिकार त्यांना नाही. हल्ली आम्ही त्यांची दखलही घेत नाहीत. ते नव्यानेच माध्यमांसमोर बोलायला शिकलेत. पण कधीतरी भरकटतात ते, असे निलेश राणे म्हणाले.
ते स्वतः ला विश्वप्रवक्ते समजायला लागले आहेत. उद्या तुम्ही त्यांना ब्रिटनच्या बोरीस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्याबद्दल विचारलं, तर त्यावरही ते बोलतील. त्यांनी असं करायला नको होते, मी त्यांना समजावलं होतं वगैरे सांगतील. ते त्या भूमिकेत गेले आहेत. काहीही बोलायला लागले आहेत, अशा शब्दांत निलेश राणेंनी टोला लगावला.