Share

Sharad kelkar : ‘शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असेल तर….’; अभिनेत्याने पत्रकाराला झाप झाप झापलं

झी स्टुडियोजची निर्मिती असलेल्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमधील दमदार संवाद ऐकून चित्रपट पाहण्याची उत्सुकता नक्कीच शिगेला पोहोचली आहे.

या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका शरद केळकर तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सुबोध भावे साकारत आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगु, कन्नड अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराज यांच्या पहिल्या भेटीचा प्रसंग अंगावर रोमांच उभा करतो. स्वराज्यासाठी प्राणपणाला लावणारे शिवाजी महाराज आणि त्यांना विरोध करणाऱ्या बांदलाचं प्रतिनिधीत्व करणारे बाजीप्रभू देशपांडे यांच्यातील चकमकीबरोबर शाब्दिक जुगलबंदी ऐकून अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही.

या चित्रपटाच्या मराठी आणि हिंदी ट्रेलरला युट्युबवर अवघ्या काही तासांतच २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ट्विटरवरही हजारो ट्विट्समुळे तो प्रथम क्रमांकावर ट्रेंड असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच शरद केळकरने बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेबद्दल भाष्य केले आहे.

शरद केळकर म्हणाला, माझ्या कारकिर्दीमधला हा आजवरचा सर्वात मोठा चित्रपट आहे असं मी मानतो. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करण्याचं भाग्य मला मिळालं. मी स्वतः ला कायम छत्रपतींचा मावळा समजतो. त्यामुळे बाजीप्रभूंची ही भूमिका माझ्यासाठी खूप खास आहे, असे शरद केळकर म्हणाला.

दरम्यान, चित्रपटाबद्दल पत्रकारांशी संवाद साधत असताना एका पत्रकाराने प्रश्न विचारताना शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. यावर शरद केळकर पत्रकाराला समजावत म्हणाला, याचसाठी हा घाट घातलाय. मी रागावलो नाहीये पण अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असेल तर त्यासाठीच हा चित्रपट केला गेला आहे.

तसेच म्हणाला, शिवरायांसारखं दुसरं कुणीही नाही आणि कुणी होऊ शकणार नाही. त्यांच्यासारखे दुसरे आदर्श नाहीत. त्यामुळे त्यांचा एकेरी उल्लेख करणं चुकीचं आहे, असे शरद केळकर म्हणाला. शरद केळकरने पत्रकाराला समजवतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा चित्रपट येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. अभिजित देशपांडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, हार्दिक जोशी प्रमुख भूमिका साकारत आहेत.

इतर

Join WhatsApp

Join Now