२०२४ साली लोकसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकांना अजून बराच कालावधी आहे. मात्र, त्याची तयारी आत्तापासूनच सुरू झाली आहे. येणारी लोकसभा निवडणूक अनेक मुद्द्यांवर लढवली जाईल. सध्या या निवडणूकीसाठी सत्ताधाऱ्यांसोबत विरोधीपक्ष देखील तयारीला लागले आहेत.
आता या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या आघाडीत कोण असेल हे अद्याप ठरलेले नाही. मात्र, कोण जिंकेल कोण हारेल हे आत्ताच सांगणे तसे कठीण नाही. विखुरलेला विरोधक आणि भाजपची एकजुटता पाहता भाजप जिंकेल असं सगळे म्हणतील.
परंतु, हे सारे युपीए लढणार की महाविकास आघाडी यावर अवलंबून असणार आहे. सर्व विरोधक एकत्र येऊन लढले तर भाजपला ही लढाई काहीशी कठीण जाईल. मात्र, आता याबाबत विरोधकांचं ठरलेलं नसताना इंडिया टीव्ही मॅटराइजने एक ओपिनियन पोल घेतला आहे.
आता जर लोकसभा निवडणूक झाली तर कोणाचे सरकार बनेल याची शक्यता या सर्व्हेतून दर्शवली गेली आहे. त्यामुळे आज निवडणुका झाल्या तर कोणाचे सरकार सत्तेत येईल यासाठी या सर्व्हे बाबत माहिती जाणून घेऊ. यामुळे आपल्याला निवडणुकीबाबत अनेक प्रश्नांची उत्तरे देखील मिळतील.
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर गुजरातमध्ये असलेल्या २६ पैकी २६ जागा भाजपला मिळतील असा अंदाज आहे. गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींच्या नावावर ६१ टक्के मते भाजपला मिळतील. तर काँग्रेसला फक्त ३५ टक्के मत मिळतील.
हार्दिक पटेलच्या भाजप प्रवेशाचा पक्षाला फायदा मिळले असे दिसत नाही. गुजरातचे लोक अजूनही पीएम मोदींच्या नावावर मत देत आहेत. महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाल्यास, महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. आज लोकसभेची निवडणूक झाली तर राज्यात भाजपला फायदा होईल असे चित्र दिसते.
२०१९च्या निवडणुकीत भाजपला २८ टक्के मत मिळाली होती. आता हे प्रमाण ३६ टक्क्यांवर जाईल. याचा अर्थ भाजपची व्होट बँक वाढताना दिसते. एकनाथ शिंदे गटाला २०१९ मध्ये ७ टक्के मत मिळाली होती. आता मात्र त्यांना १७ टक्के मतं मिळतील.
राज्यातील ४८ पैकी २६ जागा भाजपला मिळतील असा अंदाज आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला फक्त ३ तर शिंदे गटाला ११ जागा मिळतील. राष्ट्रवादी काँग्रेसला २०१९ मध्ये १६ टक्के मत मिळाली होती. आता देखील त्यांना तितकीच मतं मिळतील.
सर्वाधिक नुकसान उद्धव ठाकरे यांचे होईल असे या पोलमध्ये म्हटले आहे. त्यांच्या मतांची टक्केवारी फक्त ३ टक्के राहिल.ओपिनियन पोलनुसार गोव्यात असणाऱ्या लोकसभेच्या दोन्हीही जागा भाजपला मिळतील. मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास भाजपला २०१९ मध्ये ५२ टक्के मतं मिळाली होती.
आता निवडणुका झाल्यास गोव्यात भाजपला ५३ टक्के मतं मिळतील. काँग्रेसला इथे एका जागेचे नुकसान होईल. मध्य प्रदेशमधील लोकसभेच्या २९ पैकी २८ जागा भाजपला मिळतील. एक जागा फक्त काँग्रेसच्या हाती येईल. २०१९ मध्ये भाजपला येथे २८ जागा मिळाल्या होत्या. राज्यातील ४३ टक्के लोकांनी भाजपचे काम चांगले असल्याचे म्हटले आहे.
राजस्थानमध्ये भाजपला राज्यातील २५ पैकी २५ जागा मिळू शकतील. इथे काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही. २०१९ मध्ये भाजपने सर्व जागा जिंकल्या होत्या. राजस्थानमधील ५६ टक्के लोकांनी केंद्रात आणि राज्यात एक सरकार असेल तर फायदा होतो असे म्हटले आहे.आता निवडणूक झाल्यास ५९ टक्के मते भाजपला मिळतील.
पश्चिम बंगाल मध्ये ४२ जागा आहेत. आज निवडणुका झाल्यास भाजपला १४ जागा मिळतील. तर ममता बॅनर्जींच्या टीएमसीला २६ जागा मिळतील. काँग्रेसला दोन जागा मिळतील. भाजपला ४२ टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे.