विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरून सध्या मनोरंजन विश्वातच नाही तर राजकीय विश्वात देखील रणकंदन सुरू आहे. अनेकांनी या चित्रपटावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती असे म्हणत भाजपवर टीका केली आहे.
राजधानी दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अल्पसंख्याक विभागाचे संम्मेलन आयोजित केले होते. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. म्हणाले, देशात काय परिस्थिती आहे हे सर्वांना दिसत आहे. देशात सांप्रदायिक शक्तीचा जोर वाढत आहे. या सर्व शक्तीच्या विरोधात लढण्याची आवश्यकता आहे. असे ते म्हणाले.
काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या माध्यमातून खोटा प्रपोगंडा उभा केला जात आहे. या चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती. मात्र ज्या लोकांच्या हातात सत्ता तेच प्रचार करीत आहेत. या चित्रपटाचा आधार घेत भाजप गैरप्रचार आणि गैरसमज पसरवत असून, देशात विषारी वातावरण निर्माण करत आहे असे शरद पवार म्हणाले.
तसेच म्हणाले, दुःख याचं आहे की पंतप्रधान कुठल्याही पक्षाचे असोत त्यांना देश एक ठेवणं महत्वाचं असतं. मात्र पंतप्रधान म्हणतात चित्रपट चांगला आहे. महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन सुरू असताना एका दुपारी एकही आमदार सदनात नव्हता. सगळे चित्रपट पाहिला गेले होते. जर असंच सुरू राहिलं तर देशात एकता राहणार नाही.
यावेळी, त्यांनी शालेय अभ्यासक्रमात केल्या जाणाऱ्या बदलांविषयी भाजपवर टीका केली. म्हणाले, देशातील विविध प्रकारच्या शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष मुलांच्या मनात विष पेरत आहे. जेव्हापासून भाजपचे सरकार आले तेव्हापासून संपूर्ण देश एकाच धर्माचा असावा असा प्रयत्न केला जात आहे.
देशातील सामाजिक सौहार्द टिकवण्याचा प्रयत्न नव्हे तर हा चित्रपट करमुक्त करून भाजपचे नेते लोकांना तो बघण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. मोदी सरकारला जर खरोखरच काश्मिरी पंडितांची काळजी असती तर केंद्राने त्यांचे पुनर्वसन केले असते. पण, हे सरकार मुस्लिमांविरोधात लोकांच्या भावना भडकवण्याचे काम करत आहे, असा स्पष्ट आरोप त्यांनी केला आहे.