युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या मराठवाडा दौऱ्याचा प्रारंभ तुळजापुर येथुन झाला. त्यानंतर, उस्मानाबाद येथे मेळाव्यात बोलताना शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टोला लगावला आहे.
ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी बंडखोर आमदार, खासदार यांच्यावर निशाणा साधला. म्हणाले, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन वर्षा बंगल्यावरुन उद्धव ठाकरे मातोश्रीकडे जात असताना राजकारणाशी ज्यांचा सबंध नाही अशा सामान्य लोकांचे, महिलांचेही डोळे पानावले होते. त्या अश्रुचा बदला उद्धव ठाकरे घेतल्याशिवाय राहणार नाहीत.
मोठ्या अपेक्षेने मतदार लोकप्रतिनिधींना निवडून देतात. त्यांना निवडुन आणण्यासाठी हजारो कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत करतात. ज्या विश्वासाने आमदार, खासदार निवडुन आणतो त्या मतदाराला देखील आता आपली मान खाली घालायची वेळ आली आहे, असे ओमराजे म्हणाले.
शिवसेना आता फक्त निवडणुकीची वाट पाहत आहे, पण त्यांची तयारी काही होईना. जसा निवडणुकीला वेळ लागत आहे, तशी शिवसेनेची शक्ती वाढताना दिसते आहे. निवडणुका कधीही घेतल्या तरी शिवसेना हमखास भरारी घेईल, असा विश्वास देखील ओमराजे यांनी व्यक्त केला.
तसेच त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फेसबुकच्या कमेंट्स ऑफ केल्यामुळे अप्रत्यक्ष टोला लगावला. म्हणाले, राज्याचे सर्वोच्च पद मिळविल्यानंतरही आपल्या फेसबुकच्या कमेंटचा बॉक्स बंद करावा लागत असेल तर लोकांची भावना काय आहे हे समजायला हवे.
दरम्यान, युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी आजपासून मराठवाड्यात युवासेनेच्या निर्धार यात्रेला सुरुवात केली. यात्रेचा सुरूवात करण्यापूर्वी त्यांनी तुळजापुर येथे आई भवानीचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर उस्मानाबाद येथे झालेल्या मेळाव्यात बोलताना खासदार राजेनिंबाळकर यांनी बंडखोरांवर निशाणा साधला.