सध्या एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडीत चलबिचल होताना दिसत आहे. अशातच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचे ठरले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मला मुख्यमंत्री होण्यास सांगितले. त्यांनी म्हटले म्हणून मुख्यमंत्री झालो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर आता भाजपच्या नेत्याने ठाकरेंना टोला लगावला आहे.
भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महानगर पालिकेचाही अनुभव नव्हता तर का झाले मुख्यमंत्री, असा उलट प्रश्न उद्धव ठाकरेंना केला आहे. तसेच म्हणाले, तुम्हाला अनुभव नव्हता तर मुख्यमंत्री होण्यास नकार द्यायला हवा होता. राज्याच्या हितासाठी दुसऱ्याला पद द्यायला हवे होते.
गाडी चालवण्याचा अनुभव नाही तर चालकाच्या सीटवर बसले कशाला? अपघात करायला का, असा प्रश्नही सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरेंनी जी फेसबुक लाईव्ह घेतली त्यावर बोलताना म्हणाले, ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे हास्यास्पद आहेत.
तसेच म्हणाले, ठाकरे कुटुंबात सत्ता आणि सत्तेची वासना कधीही नव्हती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या मनात सत्तेची वासना निर्माण झाली. यामुळेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसला सोबत घेत सत्ता स्थापन केली. आता म्हणतात मी पदाचा लालची नाही.
२४ ऑक्टोबर २०१९ रोजी देशातील जनतेने शिवसेना आणि भाजपला निवडून दिले होते. त्यावेळी आम्ही सुद्धा शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी भावनिक आवाहन केले होते. मात्र, त्यांनी आमच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर युती केली. त्यामुळे आता त्यांच्या भावनिक आवाहनाला कोणताही आमदार प्रतिसाद देणार नाही, असेही सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी देखील फेसबुक लाईव्ह च्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली. महाविकास आघाडी सरकारला सरकार स्थापन होऊन तीन वर्षे झाले आहेत. असे असताना ‘अडीच वर्षांचा प्रवास… फेसबुक लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह!’ असे ट्विट करत त्यांनी ठाकरेंवर टीका केली.