शिंदे गटात सामील झालेले गुलाबराव पाटील यांनी नुकतीच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर काल ते पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या समर्थकांसमोर केलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा आहे.
गुलाबराव पाटील यांचे काल जळगाव जिल्ह्यात जंगी स्वागत करण्यात आले. शेकडो कार्यकर्त्यांनी गुलाबराव पाटील यांची जंगी मिरवणूक काढली. यावेळी गुलाबराव पाटलांनी आपल्या अंदाजात भाषण करत विरोधकांना इशारा दिला. सध्या त्यांच्या या भाषणाची सर्वत्र चर्चा आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, गेले काही मी दिवस गप्प होतो, मी मंत्री होऊ नये म्हणून काही जणांनी देव पाण्यात ठेवले होते. पण मी तिसऱ्यांदा मंत्री झालो. मिरवणुकीत हजार गाड्या होत्या, पैसा कितीही असला तरी बाजारात माणूस विकत घेता येत नाही, ३५ वर्षांची माझी ही तपश्चर्या आहे.
तसेच म्हणाले, माझ्याकडे जातीचे भांडवल नाही, माझी जात तुम्हीच आहात. बरेच दिवस माझ्यावर टीका केल्या, पण मी गप्प होतो. वरपर्यंत निरोप गेले मंत्री करू नका म्हणून, तक्रार करणारे जळगावातील होते. परंतु, मी जर माझा तिसरा डोळा उघडला तर काय करू शकतो हे त्यांना माहिती नाही असे पाटील म्हणाले.
खातेवाटपाबाबत बोलताना म्हणाले, खातेवाटपाबाबत मला कल्पना नाही. पण आमच्या पक्षात कोणतीही नाराजी नाही, प्रत्येकाला वाटत असतं की, आपल्याला चांगले खाते मिळावे आणि साहजिक तो प्रत्येकाचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी खातेवाटपावर दिली.
यावेळी गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना देखील टोला लगावला. खडसे म्हणाले होते, जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांना मंत्रिपद मिळालं आहे. आता त्यांनी तू तू मैं मैं करु नये. सर्वसामान्यांसाठी काम करावं, यावर गुलाबराव पाटलांनी खोचक टीका केली म्हणाले, आम्ही एकनाथ खडसेंचे मार्गदर्शन घेऊ.