महाराष्ट्र राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं आहे. शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड करत बहुसंख्य आमदारांसह भाजपशी युती करून सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रात दररोज काहीना काही घडामोडी घडत आहेत.
राज्यातील या पार्श्वभूमीवर शिवसेनेसोबत बंड करून शिंदे गटात सामील होणारे माजी मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. सामंत म्हणाले, आम्ही शिवसेनेमध्येच आहोत, जिल्ह्यातील शिवसेना संपेल, असे कृत्य माझ्याकडून होणार नाही.
तसेच म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उभी करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. शिवसेना सोडल्याप्रमाणे जर वागणूक मिळत असेल तर मलाही भविष्यात वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
आमदार म्हणून मी पक्ष एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. पण तरी देखील माझ्यावर टीका झाली. टीकेचा स्तरदेखील सुसंस्कृत असावा. मी शेवटपर्यंत ठाकरे- शिंदे गटाला जोडण्याचा प्रयत्न केला. त्याचे साक्षीदार खासदार विनायक राऊत आहेत, असे सामंत म्हणाले.
पुढे म्हणाले, आम्हाला प्रेमाने विचारणारे तिथे कोणी नसल्याने हा निर्णय घ्यावा लागला. मात्र, दोन महिन्यांत उद्धव ठाकरेंसह सर्वांचा गैरसमज दूर होईल असा सामंत यांनी विश्वास व्यक्त केला. म्हणाले, माझ्या घरच्या ऑफिसमध्ये माझ्यामागे बाळासाहेब, आदित्य या सर्वांचे फोटो आहेत म्हणजे मी सेनेतेच आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री होताच झटपट कामाला सुरुवात केली आहे. अनेक निर्णय घेतले आहेत. एकनाथ शिंदेंच्या कामाची ही पद्धत आहे. बाळासाहेबांच्या विचाराचा सच्चा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला. त्याला साथ देणाऱ्यामध्ये रत्नागिरीचा एक आमदार आहे, याचा मला अभिमान आहे असे सामंत म्हणाले.