काल मध्यरात्री चिपळूण येथील उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या घरावर आज्ञातांकडून दगड फेक करण्यात आली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणावर आता ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
विनायक राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, म्हणाले, शिवसैनिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर यापुढे तिथल्या तिथे प्रत्युत्तर दिलं जाईल. भास्कर जाधव हल्ले झेलण्यासाठी समर्थ आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत ते गद्दार आणि भ्रष्टाचाऱ्यांची लत्करे वेशीवर टांगल्याशिवाय गप्प बसणार नाही असे राऊत म्हणाले.
तसेच म्हणाले, नारायण राणे आणि भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांविषयीची राजकीय परिस्थिती मांडली म्हणून भास्कर जाधव यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही व्यक्तीस्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्याची पायमल्ली आहे.
शिंदे सरकारकडून आमचे नेते, उपनेते आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. अशा पद्धतीने तोंड बंद करण्याचे प्रयत्न होत असेल, तर आम्ही घाबरणार नाही. असे विनायक राऊत म्हणाले. दरम्यान, भास्कर जाधव यांच्या घरावर दगड, स्टंम्प आणि बाटल्या फेकून आज्ञात पसार झाले आहेत.
ही दगडफेक कुणी केली हे अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जाधव यांच्या घरी धाव घेत तपास सुरू केला आहे. तसेच, पोलिसांनी त्यांच्या घराभोवती बंदोबस्त वाढवला आहे. दगडफेक करणारे हे नारायण राणे यांचे समर्थक असल्याचा अंदाज देखील राजकीय वर्तुळातून वर्तविला जात आहे.
तर दुसरीकडे, शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. भास्कर जाधव यांच्या घराच्या ठिकाणी दोन पोलीस कॉन्स्टेबल कायम बंदोबस्तासाठी ठेवले होते. परंतु रात्री अचानक बंदोबस्त का हटवण्यात आला, कोणाच्या आदेशाने पोलीस बंदोबस्त हटवण्यात आला असे प्रश्न शिवसैनिक उपस्थित करत आहेत. तसेच हल्ल्यामागे असलेल्यांना तात्काळ ताब्यात घ्या, अन्यथा आंदोलन करू असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.