राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केल्याने महाविकास आघाडीत तीव्र पडसाद उमटले आहेत. नवाब मलिक यांना सात दिवसांची कोठडी सुनावली आहे. या कारवाईनंतर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले असून, त्यांनी ईडी लावली तर आपण सीआयडी लावून भाजपवर कारवाई करावी अशी मागणी आता मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मनी लॉण्ड्रींग प्रकरणी नवाब मलिक यांना अटक करण्यात आली असून गुन्हेगारांशी संबंधित लोकांकडून जमीन खरेदी केल्याचा ठपका नवाब मलिक यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांना सत्र न्यायालयाकडून तीन मार्चपर्यंत कस्टडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील नेते आक्रमक झाले आहेत.
नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक मध्ये महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी मागणी केली.
महाविकास आघाडीतील नेत्यांवर कारवाई होत असताना जशास तसे उत्तर देण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे. राज्य सरकार आता भाजप नेत्यांवर कारवाई करण्याच्या पवित्र्यात आहेत. भाजप ईडीचा वापर करत आहे तर आपण सीआयडी वापरावी, भाजपचे लोक काचेच्या घरात राहतात त्यांच्यावरही कारवाई सुरू करा, असा सूर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लावला आहे.
यावेळी, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, अजित पवार,दिलीप वळसे पाटील आदी प्रमुख नेते वर्षा बंगल्यावर उपस्थित होते. या तिन्ही पक्षातील नेत्यांनी भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी आक्रमक भूमिका मुख्यमंत्र्यांपुढे मांडली.
दरम्यान, केंद्रातील तपास यंत्रणा गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील सरकार तसेच मंत्र्यांविरोधात कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्टच दिसत होते. त्यादृष्टीने आवश्यक पार्श्वभूमी तयार करीत नवाब मलिक यांच्या निमित्ताने केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून हा राजकीय डाव साधला गेल्याची भावना महाविकास आघाडीने व्यक्त केली आहे.