‘शिवसेना -मनसे एकत्र येण्याचे बाळासाहेबांचे भाकीत सत्यात उतरत असेल तर…’ शिंदे गटाकडून युतीचे संकेत

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिंदे गट एकत्र येणार का? या चर्चेला उधाण आले आहे. त्यातच आता शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिंदे गट युतीचे संकेत मिळाले आहेत.

शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर म्हणाले, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-मनसे आणि शिवसेनेतील शिंदे गट हे एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना अभिप्रेत असणारी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पुढे जात आहे.

त्यामुळे शिवसेना-मनसे एकत्र यावेत हे भाकीत बाळासाहेब ठाकरेंनी केले होते. हे जर सत्यात उतरत असेल तर वाईट वाटण्याचं कारण नाही, असे किरण पावसकर म्हणाले. तसेच, मुंबई महापालिकेत कुणाशी कशी युती होईल याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पावसकर म्हणाले, राज ठाकरेंसोबत शिवसेनेतून त्यावेळी नेते बाहेर पडले होते. ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. पण, माझा राग विठ्ठलावर नाही, तर आजूबाजूच्या बडव्यांवर आहे, असं राज ठाकरेंनी पहिल्याचं भाषणात म्हटलं होतं. त्यामुळे राज ठाकरे आणि त्यांचे सहकारी आजही हिंदुत्वापासून कुठेही दूर गेले नाहीत, असे पावसकर म्हणाले.

पुढे पावसकर म्हणाले, राज ठाकरेंनी मुंबई आणि महाराष्ट्रासाठी जी भूमिका मांडली. ती भूमिका सर्वश्रूत आहे. आज इतक्या वर्षाने तोच प्रश्न उभा राहिला आहे. शिवसेना प्रमुखांवर प्रेम करणारे परंतु कार्यपद्धती वेगळी असणारे, दैवत आमचं एकच आहे. मात्र, आजूबाजूच्या बडव्यांमुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकनाथ शिंदे बाहेर पडले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर गणपतीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. त्याचवेळी भाजप-शिवसेना सत्ताधारी आमदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे, अशी माहिती पावसकर यांनी दिली आहे. त्यामुळे मनसे-शिंदे गट यांची पुढची रणनीती काय असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.