अमृतसर | सध्या राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडींना सुरुवात झालेली दिसून येत आहे. अनेक नेते, मंत्री सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यात व राज्यात जावून जनतेला संबोधित करतांना दिसून येत आहेत. अशातच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा रविवारी अमृतसरमध्ये मेगा रोड शो झाला.
यावेळी अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या जनतेला संबोधित केले. एवढेच नाही तर त्यांनी भगवंत मान यांचे तोंडभरुन कौतुकहि केले. तसेच, आम आदमी पक्षाच्या आमदारांसह इतर आमदारांना खडेबोल सुनावले. अरविंद केजरीवाल एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी पक्षातील आमदारांसह मंत्र्यांना देखील कडक शब्दात इशारा दिला.
अमृतसरमध्ये जनतेला संबोधित करतांना अरविंद केजरीवाल यांनी भगवंत मान यांचे तोंडभरून कौतुक केले. म्हणाले की, माझा लहान भाऊ भगवंत मान हा अतिशय प्रामाणिक माणूस आहे. पंजाबला आतापर्यंतचा सर्वात प्रामाणिक मुख्यमंत्री मिळाला आहे. पंजाबमध्ये प्रामाणिक सरकार स्थापन होईल. यावर आमचा विश्वास आहे.
मात्र, आमच्या कोणत्याही मंत्र्याने किंवा राज्यातील कुठल्याही आमदाराने पैशांचा घोटाळा केला, तर त्याला थेट तुरुंगात टाकले जाईल. काही लोक पंजाबला लुटत होते, आता ही लूट थांबेल. आता सरकारचा प्रत्येक पैसा पंजाबमधील गरीब जनतेवर खर्च केला जाईल. सामान्य जनतेला आपने दिलेली सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करू. यादरम्यान, काही गोष्टींना वेळ लागेल, तर काही लगेच पूर्ण होतील, असे केजरीवाल म्हणाले.
येत्या १६ मार्चला भगवंत मान मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पण या दिवशी फक्त भगवंत मान मुख्यमंत्री होणार नाहीत, तर पंजाबचा प्रत्येक मुलगा मुख्यमंत्री होईल. असेही केजरीवाल म्हणाले. दरम्यान, या शपथविधी सोहळ्यात अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला शपथ घेण्यासाठी आमंत्रित केले आहे.
११ मार्च रोजी मोहाली येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत आपचे मुख्यमंत्री उमेदवार भगवंत मान यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे या रोड शो चे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी भगवंत मान यांनी आपचे मुख्य संयोजक अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान हे दोघेही सुवर्ण मंदिरात नतमस्तक झाले.
या रोड शो दरम्यान केजरीवाल यांनी जनतेला संबोधित केले आणि त्यानंतर भगवंत मान यांनी देखील जनतेला संबोधित करत आपली मते मांडली. भगवंत मान म्हणाले की, आप हा चळवळीबाहेरचा पक्ष आहे. उपोषण करुन तसेच कठीण परिश्रम करून हा आपला पक्ष तयार झालेला आहे.
पुढे त्यांनी असेही सांगितले कि, पहिल्या दिवसापासून हे सरकार जोमाने काम करेल. आम्ही पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी १२२ माजी नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पोलिसांना पोलिसांची कामे करायला मिळतील, त्यांना त्रास होणार नाही.
येत्या १६ मार्च रोजी, नवाशहर जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांचे मूळ गाव असलेल्या खटकर कलान येथे दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्यास सर्वसामान्य जनतेला आमंत्रित केले असून, सर्व जनतेचे या सोहळ्याकडे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
‘‘महाराष्ट्राच्या जनतेने गेल्या ५५ वर्षांत मला एका दिवसासाठीही रजेवर पाठवलेले नाही यासाठी मी त्यांचा ऋणी’’
बहिण मालविकाच्या पराभवानंतर सोनू सूदचं पहिलं ट्विट वाऱ्यागत व्हायरल; बड्या – बड्या नेत्यांच्या भुवया उंचवल्या
तिसरे अपत्य असल्यामुळे महिलेला गमवावी लागली सरकारी नोकरी, न्यायालयाने दिला मोठा निर्णय
आमदार झाल्यानंतर सर्वात आधी विरोधी पक्षातील उमेदवाराचे घेतले आशिर्वाद, होतोय कौतुकाचा वर्षाव