Share

200 आमदार निवडून नाही आणले तर शेती करायला निघून जाईल, एकनाथ शिंदेंचे ओपन चॅलेंज

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांसह बंड केले, आणि भाजपशी हातमिळवणी करून नवीन सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यात आज विधानसभा सभागृहात विश्वासदर्शक ठरावाच्या अभिनंदन प्रस्तावावर उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी जबरदस्त भाषण केले. ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक गौप्यस्फोट केला म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळातच मला मुख्यमंत्री करायचं ठरलं होतं. तसेच २०१४ मध्ये भाजप-शिवसेना युती असतानाच मला उपमुख्यमंत्रीपद देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हाच मला सांगितले होते. पण ते मला मिळणार नाही, याची खात्री होती. कारण हे पद मला आमच्या पक्षाला द्यायचे नव्हते.

मुख्यमंत्री पदाबद्दल त्यांनी एक प्रसंग विशद केला, म्हणाले, महाविकास आघाडी सरकार असल्याने मला मुख्यमंत्रीपद देता येत नाही, असे आमच्या नेतृत्वाने सांगितले होते. त्यानंतर स्वतः ठाकरे मुख्यमंत्री झाले. मी नाराज झालो नाही. कारण पदासाठी मी कधीच काम केले नाही.

तसेच त्यांनी आज जोरदार बॅटिंग करत आपण आणि फडणवीस मिळून आगामी विधानसभा निवडणुकीत २०० जागा निवडून आणू, असा विश्वास व्यक्त केला. तसे जर झाले नाही मी शेती करायला निघून जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

एकनाथ शिंदे म्हणाले, माझ्यासोबत असलेल्या ५० पैकी एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीस आणि आमचा अजेंडा सेम आहे. आमचे ५० आणि त्यांचे ११५ असे एकूण १६५ आमदार झाले आहोत. पुढील निवडणुकीत ते २०० करू.

शिवसेना सोडलेल्या नेत्यांना पुढे राजकीय भवितव्य नसल्याचे अजित पवार यांनी भाषणात म्हंटले होते, त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, ज्यांनी शिवसेना सोडली ते सेनाविरोधातील पक्षात गेले होते. आम्ही हिंदुत्व तिकडे गेलो आहोत. त्यामुळे तशी अडचण येणार नाही.

चिन्ह काय मिळणार, कधी मिळणार याची काळजी नाही. आपण शिवसेनेवाले आहोत. जिथे लाथ मारू तिथून पाणी काढू, पण माझ्यासोबत असलेल्या एकाही आमदाराला कमी पडू देणार नाही. असे शिंदे यांनी उत्तर दिले. आज एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच इतर बंडखोर नेते आणि भाजप नेत्यांनी देखील जबरदस्त भाषणं केली.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now