Share

आनंद दिघेंसोबत जे घडलं त्याचा मी साक्षीदार, जास्त बोलाल तर तोंड उघडेल; शिंदेंची ठाकरेंना थेट धमकी

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या मुलाखतीत ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच बंडखोरी करणाऱ्या सर्व आमदार, खासदार यांच्यावर टीका केली. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी बंडखोर नेते, माजी मंत्री दादा भुसे यांच्या मालेगावात सभा घेत मोठं शक्तीप्रदर्शन केलं. त्यावेळी भाषणात त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या सेना नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, आमच्या माथ्यावर गद्दारीचा शिक्का मारला जातोय. पण आम्ही गद्दार नाही. आम्ही आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची शिकवण घेऊन पुढे चाललोय. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर कधी युती करणार नाही, तशी वेळ आली तर आम्ही आमचं दुकान बंद करु असं बाळासाहेब म्हणाले होते.

म्हणाले, ज्यांच्यासोबत लढलो, त्यांच्याविरोधात जाऊन मुख्यमंत्रिपदासाठी वेगळी भूमिका घेतली. मुख्यमंत्रीपदासाठी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केले. बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी कधी तडजोड केली नाही, त्यांनी विचारांशी कधी प्रतारणा केली.

उद्धव ठाकरे आणि माझ्यातील ज्या गोष्टी आहेत, त्या मी आज सांगणार नाही. मात्र एक दिवस मलाही तोंड उघडावे लागेल, मलाही भूकंप करावा लागेल. मी कधीही कोणावर खालच्या भाषेत बोलत नाही, मात्र अन्याय झाला तर सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

आनंद दिघे यांच्याबद्दल बोलताना म्हणाले, आनंद दिघे यांनी त्यांचं आयुष्य शिवसेनेसाठी वाहून घेतलं. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत त्यांनी शिवसेना वाढीसाठी काम केलं. पण त्यांच्याबाबतीत खूप राजकारण झालं. धर्मवीर आनंद दिघे यांच्या बाबतीत जे घडलं, त्याचा मी साक्षीदार आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

त्यांच्यासोबत घडलेल्या घटना मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत. त्यांच्यावर ओढावलेले प्रसंग देखील मी पाहिले आहेत. मी ज्यादिवशी माध्यमांना मुलाखत देईन, त्यादिवशी राज्याच्या राजकारणात भूकंप होईल. सध्या मी काही बोलणार नाही. पण समोरुन जर तोंड उघडलं गेलं तर मी पण शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now