कोल्हापूर उत्तरचा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असताना उमेदवारी डावलल्यानं, माजी आमदार राजेश क्षीरसागर चांगलेच नाराज आहेत. त्यातून गेले दोन दिवस ते नॉटरिचेबल होते. त्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली होती. रविवारी संध्याकाळी ते कोल्हापुरात आले. परंतू महाविकास आघाडीच्या मेळाव्याला न जाता त्यांनी शिवसेनेच्या कार्यालयासमोर मेळावा घेत आपली खंत बोलून दाखवली.
कोल्हापूर उत्तरमध्ये महाविकास आघाडीच्या मेळाव्याला पाठ फिरवत क्षीरसागर यांनी स्वतःचा वेगळा कार्यक्रम घेत आपल्या समर्थकांच्या साथीने शक्तीप्रदर्शन करत नाराजी बोलून दाखवली आहे, म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमधील काही नेत्यांमुळं, 2019 च्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात माझा पराभव झाला. त्याच कॉंग्रेससाठी शिवसेनेला आता मतदार संघ सोडावा लागणं दुर्दैवी आहे.
तसेच म्हणाले, महाविकास आघाडी करत असताना तीनही पक्षांनी एकत्र राहण्याचे ठरले होती. तरीही काँग्रेस-राष्ट्रवादीने कोल्हापूर जिल्हा बॅंकच्या निवडणुकीत भाजपबरोबर आघाडी केली. त्याचे उत्तर त्यांनी शिवसेनेला देण्याची गरज आहे. असे क्षीरसागर यांनी भर मेळाव्यात सांगितले.
गेल्या अडीच वर्षात कोट्यावधी रूपयांचा निधी खेचून आणून, शहरात विकासकामं केली. कोल्हापूर उत्तर मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तिरंगी लढत झाली असती, तर काँग्रेसला शिवसेनेची ताकद दाखवून दिली असती, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
म्हणाले, विधानसभेच्या 2014 निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपचे सरकार आले. त्यावेळी मला मंत्री केले असते, तर 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे पाच आमदार पडले नसते. उलट मी आपल्या सहा आमदारांचे आठ आमदार करून दाखवले असते, अशी खंत क्षीरसागर यांनी बोलून दाखवली.
दरम्यान मेळाव्यात अनेक शिवसैनिकांनीही तीव्र भावना व्यक्त करत मनातील खदखद व्यक्त केली. कसबा बावडयातील नेत्याची हुकूमशाही मोडून काढण्यासाठी राजेश क्षीरसागर यांनी निवडणूक रिंगणात उतरावं, असा थेट आग्रह यावेळी शिवसैनिकांनी धरला. आपली नाराजी बोलून दाखवताना क्षीरसागर यांनी पक्षप्रमुखांचा आदेश आपल्यासाठी अंतिम आहे आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे काम करत राहू असंही जाहीर केलं.