राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन जवळपास ४ महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र, अद्याप मंत्रीमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडला नाही. त्यामुळे मंत्रीमंडळाच्या पहिल्या टप्प्यात वंचित राहिलेले अनेक आमदार दुसऱ्या टप्प्याची वाट पाहत आहेत.
अनेक आमदार मंत्रीमंडळाच्या पहिल्या टप्प्यात आपल्याला समाविष्ट केलं नसल्याने नाराजही होते. त्यात अमरावतीचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा देखील समावेश आहे. बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंना साथ देऊनही त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात जागा मिळाली नाही, त्यामुळे ते नाराज होते.
आता त्यांची ही नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. बच्चू कडू आज अमरावती येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. त्यांना पत्रकारांनी मंत्रिमंडळ विस्तारावर प्रश्न विचारला असता, कडू यांनी जे वक्तव्य केलं त्यातून त्यांची नाराजी दिसून आली.
बच्चू कडू पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाले, ‘मी काय प्रमुख आहे का? शिंदे गट आणि भाजपमध्ये आमचा प्रहार पक्ष लहानसा पक्ष आहे’, तसेच जेव्हा पत्रकारांनी मंत्रीपदाबाबत प्रश्न केला तेव्हा म्हणाले, ‘मी आता मंत्री होईल नाहीतर अडीच वर्षानंतर मला मंत्रीपद मिळेल,’
बच्चू कडू यांच्या या विधानानंतर ते पुन्हा नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या अनुदानासंदर्भात विचारणा केली असता, बच्चू कडू यांनी मीडियावरच आगपाखड केल्याचं दिसून आलं.
बच्चू कडू म्हणाले, माझ्यासोबत चला, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे दाखवतो. तुम्ही माहिती घेत नाही, संशोधन केलं पाहिजे पत्रकारांनी. किती जणांच्या खात्यात पैसे आले तुम्हाला दाखवून देतो. दोन दिवस अगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, असे बच्चू कडू म्हणाले.