‘रामदास कदम सारखा कृतघ्न माणूस मी बघितला नव्हता, पक्का उलट्या काळजाचा आणि बेईमान माणूस’

एकनाथ शिंदे गटातील रामदास कदम हे सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. या टीकेला आता शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी तीव्र शब्दांत प्रतिउत्तर दिलं आहे. त्यांनी रामदास कदम यांचा उल्लेख कृतघ्न असा केला आहे.

शिवसेना दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरुन भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल केला. म्हणाले, हे तेच रामदास कदम आहेत ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते म्हणून शिवतीर्थावरुन भाषण केले आहे.

तेच रामदास कदम आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती शिवसेना मेळावा शिवतीर्थावर नको म्हणून प्रतिक्रिया देत आहेत. ते किती उलट्या काळजाचे आणि बेईमान आहेत हे महाराष्ट्रातील जनता पाहात आहे, असे भास्कर जाधव म्हणाले.

तसेच म्हणाले, कोण आहेत रामदास कदम? त्यांचा शिवसेना आणि दसरा मेळाव्याशी संबंध काय? बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेता म्हणून त्यांनी शिवाजी पार्कवरुन दसरा मेळाव्यात भाषण ठोकले. आता तेच म्हणत आहेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना मेळावा नको. त्यांच्या ते इतके कृतघ्न असतील असे मला कधीच वाटले नव्हते, असे भास्कर जाधव म्हणाले.

दरम्यान, रामदास कदम यांनी शिवसेना सोडल्यापासून सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सुरु केले आहे. उद्धव ठाकरे हे जेव्हा शरद पवार आणि काँग्रेस यांच्यासोबत गेली तेव्हाच बाळासाहेबांची शिवसेना संपली, अशी टीका सातत्याने रामदास कदम करत आले आहेत.

त्यांच्या याच टीकेवरुन भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर प्रतिहल्ला चढवला आहे. आता भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांना दिलेल्या उत्तरावर कदम काय प्रतिक्रिया देतील हे येणाऱ्या काळात समजेल. मात्र, सध्या शिंदे आणि ठाकरे गटाचे वाद किती टोकाला गेले हे यावरून दिसत आहे.