भाजपचे जेष्ठ नेते नारायण राणे यांना नुकतेच मुंबई उच्च न्यायालयानं दणका देत त्यांच्या मुंबईतील बंगल्याचं बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच १० लाखांचा दंडही ठोठावला आहे. यावरून आता शिवसेना नारायण राणे आणि किरीट सोमय्या यांच्यावर घणाघात करत आहेत.
शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी नारायण राणेंसह खासदार किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयानं राणेंच्या बंगल्याच्या बाबतीत दिलेल्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तसेच सत्तेचा अहंकार कितीही केला तरी न्यायदेवतेपुढं सर्वांना झुकावंच लागतं हे दर्शवून देणारा हा निर्णय आहे, असे म्हणत टोला लगावला आहे.
तसेच म्हणाल्या, ‘आमदार व माजी मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्याची भाषा करणारे सोमय्या हे थर्माकोलचे हातोडे घेऊन गावोगावी फिरत असतात, पण मी त्यांना खराखुरा हातोडा देते. हा हातोडा घेऊन त्यांनी नारायण राणे यांच्या जुहूच्या बंगल्यावर पहिला घाव घालावा,’ असे मनीषा कायंदे म्हणाल्या.
हायकोर्टाच्या या निर्णयावर चंद्रकांत खैरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली. चंद्रकांत खैरे काल मुंबईत आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. म्हणाले, आई जगदंबेने नारायण राणेंचा बदला घेतला. आता राणे यांची खासदारकी देखील रद्द झाली पाहिजे, अशी मागणी खैरे यांनी केली.
दरम्यान, नारायण राणे यांचा जुहू येथील अधीश बंगला पाडण्याबाबत मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. नारायण राणे यांच्या जुहु येथील अधीश बंगल्यावर बुलडोझर चालवण्याचे आदेश हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दिले आहेत.
यासोबतच नारायण राणे यांना १० लाख रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. अधीश बंगल्याचे बांधकाम अनियमित असल्याने महापालिकेने नारायण राणे यांना आधी नोटिस बजावली होती. नारायण राणे यांचा अधीश बंगला त्याच्या उंचीवरून वादात सापडला आहे.






