Share

‘आमदारकी मंत्रिपद द्यायचं नव्हतं, पण माझ्या लेकराला मारायचं नव्हतं’, विनायक मेंटेंच्या आईने फोडला टाहो

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीचा रविवारी भीषण अपघात झाला. या अपघातात मेटे यांचं निधन झालं. काल बीडमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मेटे यांना शेवटचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर उसळला.

मेटे यांच्या जाण्याने अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. त्यात काहींनी त्यांच्या या अपघाताबद्दल शंका व्यक्त केल्या. आता, मेटे यांचा अपघात की घातपात आहे, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

दरम्यान मेटेंच्या आईंनी एका खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. मेटे यांची आई म्हणाल्या, त्यांनी जाणून बुजून माझं लेकरू मारलं आहे. गरिबाचं लेकरू होतं. त्यांनी आमदारकी द्यायची नव्हती. मंत्रिपद द्यायचं नव्हतं. पण माझं लेकरू मारायचं नव्हतं. कुणी बोलू द्या मला, मी कोर्टात येते.

मी अडाणी बाई आहे. माझा डोंगर पेटला आहे, माझं लेकरु अपघाताने गेलं नाही, माझं लेकरु मराय सारखा नव्हता. जाणून बुजून माझं लेकरु मारलं, त्याची चौकशी करा, माझ्या लेकराला सुरक्षा कशी दिली नाही असे मेटे यांची आई म्हणाली.

मेटे यांच्या आईने दिलेल्या या प्रतिक्रियांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी ट्विट केला आहे. या व्हिडीओवरती त्यांनी या मातेची आर्त किंकाळी सरकार ऐकणार का? असा सवाल देखील केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मराठा क्रांती मोर्चाची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला हजेरी लावण्यासाठी मेटे बीडहून मुंबईकडे येत होते. बीडमधला कार्यक्रम सोडून मेटे मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. पण वाटेत त्यांचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now