Share

‘मी शिंदे गटात गेलो नाही, माझं नाव त्यामध्ये घेऊ नका’; बड्या शिवसेना नेत्याने शिंदेंना ठणकावले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. बहुसंख्य शिवसेनेचे नेते शिंदे गटात गेले आहेत. शिवसेनेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून धक्के बसले आहेत. त्यानंतर महाराष्ट्राबाहेरुनही हादरे मिळाल्याचा दावा केला जात होता.

नुकतेच, बारा राज्यातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी मंगळवारी मुंबईत बैठक घेत शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यात गोव्यातील शिवसेनाप्रमुख जितेश कामत हे देखील शिंदे गटात गेल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता जितेश कामत यांनी व्हिडीओ बनवत याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटलोही नाही, असे सांगत त्यांनी शिंदे गटात प्रवेशाचा दावा फेटाळून लावला. म्हणाले, मी शिंदेंना भेटायलाही गेलो नव्हतो. जे कोण भेटले, त्यांच्या विषयी मला माहिती नाही. माझे नाव त्यामध्ये घेऊ नये. कारण त्या व्हायरल फोटोत तर मी कुठे दिसत नाही, कारण मी तिथे गेलोच नाही. उद्धव ठाकरे यांनी मला पद दिले, मी त्यांच्यासोबतच आहे.

दरम्यान, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गोवा, मणिपूर, छत्तीसगड या राज्यांच्या शिवसेना प्रमुखांनी शिंदे गटाला समर्थन दिल्याचा दावा केला जात होता. मात्र त्यापैकी गोव्यातील जितेश कामत यांनी आपण शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचं म्हटलं आहे.

आगामी काळात खरी शिवसेना कोणाची, धनुष्यबाण हे शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह कोणाकडे जाणार, यासारखे प्रश्न सुप्रीम कोर्ट किंवा निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहेत. अशा वेळी या बड्या नेत्यांचं समर्थन निर्णायक ठरु शकतं.

शिवसेनेच्या घटनेत राज्याबाहेरील पदाधिकाऱ्यांचं मतही ग्राह्य धरलं जाणार असल्याचा उल्लेख असल्यामुळे शिंदेंनी त्यांनाही आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. आता शिंदे आणि उद्धव ठाकरे या संघर्षाचा निर्णय पुढे काय लागणार पाहावं लागेल.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now