केंद्रीय तपास यंत्रणांकडून गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर कारवाया होत आहेत. या कारवाईबद्दल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी या गोष्टीचा त्रास होतो पण आपण घाबरत नसल्याचं सांगितलं.
पुण्यात जेष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तसेच काँग्रेस नेते सचिन सावंत यांची संयुक्त मुलाखत घेतली. यावेळी संजय राऊत यांना ईडीच्या कारवाईबाबत प्रश्न विचारण्यात आला.
ईडी कारवाईबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, धाडींना आपण खाबरत नाही. माझ्या नातेवाईकांच्या घरी जेव्हा ईडीने धाड टाकली त्या रात्री मी दिल्लीत होतो. धाडीच्या दुसऱ्या दिवशी मी गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला त्यांना सांगितलं मी दिल्लीत आहे. मला अटक करा, माझ्या निकटवर्तीयांना त्रास देऊ नका. मी घाबरत नाही.
नेहमी तुमच्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यावरच धाडी पडतात. भाजपच्या नेत्यांवर धाडी पडत नाही. याचा तुम्हाला त्रास होत नाही का, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला तर संजय राऊत म्हणाले, त्रास म्हटलं तर होतो. परंतु, करून घ्यायला नको. याचं आम्ही २०२४ नंतर उत्तर देऊ. सगळ्यांचे दिवस येतात. आमचे पण दिवस येतील.
संजय राऊत म्हणाले, माझ्यासारख्या माणसाची नसलेली प्रॉपर्टी जप्त केली. मी ज्या घरात राहतो ते घर, आणि माझी वडिलोपार्जित ४०-४५गुंठे जमीन आहे. कोणतीही नोटीस न देता जप्त केली. मग, मी निरोप दिला अरे, मी बसलोय, कधी अटक करणार? ज्यादिवशी माझ्या जवळच्या लोकांवर धाडी पडल्या, त्यादिवशी मी रात्री बारा वाजता दिल्लीत अमित शहांना फोन केला.
अमित शहा यांना फोन वर सांगितले, मी दिल्लीमध्ये बसलेलो आहे. माझ्यासाठी गरिबांना का त्रास देत आहात? मी बसलेलो आहे. मला अटक करा. आम्ही घाबरत नाहीत. हा किस्सा सांगताना संजय राऊत म्हणाले, पुष्पा चित्रपटातील डायलॉग आहे ना, ‘झुकेंगा नही’ असं म्हणत आपले ईडीबाबत स्पष्ट मत मांडले.