शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना रविवारी सक्तवसुली संचलनालयाने अटक केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला आहे.
नुकतेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आपल्या भाषणात शिवसेनेवर निशाणा साधला होता, महाराष्ट्रातील शिवसेना लवकरच संपुष्टात येणार असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत टीका केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, तुमच्याकडे आज बळ आहे पण सगळ्यांचे दिवस फिरत असतात. तुमचे दिवस फिरले की काय होईल याचा विचार तुम्ही करू शकत नाही. असं म्हणत त्यांनी संजय राऊतांचा काय गुन्हा होता? असा सवाल केला आहे.
जे.पी. नड्डा यांच्याबद्दल बोलताना म्हणाले, जे. पी. नड्डा यांनी केललं वक्तव्य लोकशाहीसाठी खूप धोकादायक आहे. शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सध्या होत आहेत पण ते होऊ शकत नाही, देशातील राजकारण आता घृणास्पद होऊ लागलं आहे. तुम्हाला शिवसेना संपवायची असेल तर जनतेत जाऊन संपवून दाखवा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.
तसेच म्हणाले, विरोधकांना वाटेल ते करून अडकवायचं अशी स्थिती सध्या देशात चालू आहे. प्रादेशिक अस्मिता आणि हिंदू अस्मिता चिरडून टाकण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. तसेच संजय राऊत यांचं देखील त्यांनी यावेळी कौतूक केलं.
म्हणाले, संजय राऊत हा माझा जुना मित्र आहे, त्याचा मला अभिमान आहे. त्याचा गुन्हा नसतानाही त्याला अटक करण्यात आली आहे. मरण आलं तरी शरण जाणार नाही हे संजयचं वाक्य मला खूप आवडतं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तसेच म्हणाले, संजय राऊत देखील शरण जाऊ शकत होते पण ते गेले नाहीत कारण ते एकनिष्ठ आहेत. त्याचबरोबर जे माझ्यासोबत आहेत ते दमदार आहेत आणि जे तिकडे गेले आहेत त्यांना तिकडे फक्त सत्तेचा फेस शिल्लक राहिल्यावर समजेल असं ठाकरे म्हणाले.