Share

मी पुणे शहराचं नाही तर माझ्या प्रभागाचं नेतृत्व करतोय, त्यामुळे…; भोंगे आंदोलनावर वसंत मोरे स्पष्टच बोलले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या आदेशानंतर मनसैनिक राज्यभर आक्रमक झालेले आहेत. पुणे शहरात देखील मनसे आक्रमक पवित्र्यात असताना, मनसे नेते आणि माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे हे मात्र तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले असल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या दिवशी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे मनसे नेते वसंत मोरे हे नाराज होते. त्यासंदर्भात त्यांनी आपले मत देखील व्यक्त केले होते. त्यानंतर त्यांच्याकडून पुण्यातील मनसेचे शहराध्यक्षपद काढून घेतले गेले. वसंत मोरेंची नाराजी सर्वांना दिसून आली.

वसंत मोरे हे पक्षाला रामराम ठोकणार, अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र वसंत मोरेंनी वेळोवेळी स्पष्टीकरण देऊन आपण मनसे सोबतच आहोत असे सांगितले. दरम्यान, काल राज ठाकरे यांच्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या आदेशानंतर मनसैनिक राज्यभर आक्रमक झालेले दिसले.

मात्र, या सगळ्यात वसंत मोरे कुठेच दिसत नसल्याने, पुन्हा एकदा मोरे पक्षाला राम राम ठोकणार अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र, वसंत मोरे यांनी पुढे येऊन याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आहे. पण मी सध्या पुणे शहराचे नाही, तर माझ्या प्रभागाचे नेतृत्व करतोय. साहेबांच्या आदेशानंतर मी माझ्या भागातील मशिदींच्या प्रमुखांसोबत लोकप्रतिनिधी म्हणून बोललो आणि त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली. आजची नमाज भोंग्याविना केली आणि भविष्यात ही सहकार्य करू असे त्यांनी मला सांगितले.

https://www.facebook.com/100044231363898/posts/554161776068196/?app=fbl

तसेच वसंत मोरेंनी शेवटी त्यांच्या प्रभागातील सर्व मुस्लीम बांधवांचे आभार मानले. दरम्यान, गुढीपाडव्याच्या सभेपासूनच वसंत मोरेंनी मनसे पासून अंतर राखण्यास सुरूवात केली होती. नुकतेच राज ठाकरे औरंगाबादच्या सभेला निघण्यापूर्वी मोरे यांचे पुण्यातील निवासस्थान ‘राजमहाल’ बाहेर शेकडो पुरोहितांच्या साक्षीने मंत्रपठण करण्यात आले होते. त्यावेळी देखील वंसत मोरे गैरहजर होते. तेव्हापासून ते पक्ष सोडतात का याबाबत चर्चा सुरू आहेत.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now