पाचोरा : भारत हा विविधतेने व एकतेने नटलेला देश आहे. इथे सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. याच गोष्टींचा प्रत्यय पाचोरा तालुक्यातील आंबे वडगाव येथे पार पडलेल्या एका लग्न समारंभातून दिसून आला.
सध्या हनुमान चालिसा, भोंगे आदींमुळे राज्याचे राजकारण धार्मिक आणि सामाजिक द्वेष निर्माण करत आहे .यामधुन सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही शक्तींकडून केला जात आहे. परंतु अशा कुठल्याही धार्मिक द्वेषाला न जुमानता सामाजिक एकता जपणारी काही मंडळी आजही या समाजात आहेत, याची प्रचिती आंबे वडगाव (ता. पाचोरा) येथे आली.
या गावात झालेल्या एका विवाह सोहळ्यानं सर्वांचे लक्ष वेधलं… हिंदू मित्राच्या मुलीचे मुस्लिम दांपत्याने कन्यादान करून एकतेचे दर्शन घडवले.
शिंदाड येथील वाल्मीक अहिरे यांचे मित्र हाजी युनूस शाह पिंपळगाव बसवंत (नाशिक) येथे वास्तव्यास आहेत. अहिरे यांची कन्या प्रियंका हिचा विवाह आंबे वडगाव (ता. पाचोरा) येथील भास्कर शिंदे यांचे पुत्र विशाल यांच्याबरोबर आंबे वडगांव येथे नुकताच पार पडला.
विवाह निश्चितीपासून ते विवाह पार पडेपर्यंत वाल्मीक अहिरे यांचे मित्र हाजी युनूस शाह यांनी खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत सर्व ठिकाणी उपस्थित राहिले. विवाहप्रसंगी पिंपळगाव बसवंत येथून म्हणजे सुमारे दोनशे किलोमीटरवरून पत्नी परवीन व शालकासह त्यांनी हजेरी लावली. विवाह सोहळा पार पडल्यानंतर हाजी युनूस शाह पत्नीसह प्रियंकाच्या कन्यादान विधीसाठी बसले व त्यांनी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात हिंदू धर्मानुसार कन्यादानाचे सर्व विधी पार पाडले.
पवित्र रमजानचा महिना सुरू असल्याने शाह दांपत्याने या वेळी अल्लाहकडे प्रियंकाच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी विनवणी करत साकडे घातले. प्रियंकाचे कन्यादान करून त्यांनी हंडा, कळशी व तांबे धातूचा कलश भेट दिला. हिंदू मित्राच्या मुलीच्या विवाहास उपस्थिती लावून व हिंदू विधीप्रमाणे तिचे कन्यादान करून मैत्रीतील जिव्हाळा, प्रेम, आपुलकी तसेच जातीय, धार्मिक एकता अहिरे व शाह यांच्या मैत्रीने सिद्ध केली.खऱ्या अर्थाने भारतीय एकतेचे दर्शन घडवणारी ही घटना आहे.
महत्वाच्या बातम्या
“मी धर्मांध नाही तर धर्माभिमानी…”; औरंगाबादमधील राज गर्जनेचा टीझर रिलीज; व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
खळबळजनक! हिंदू तरूणीशी नाव बदलून केलं लग्न, भावासह मौलवीनं केला बलात्कार, दोन वेळा गर्भपात
शरद पवार भारतीय राजकारणातील सर्वात भ्रष्ट व ढोंगी व्यक्ती; प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या आरोपांनी खळबळ
गणेश नाईकांना करणी सेनेचा खंबीर पाठिंबा; ‘लिव इन रिलेशनशिपमध्ये बलात्कार नसतो’