गेल्या दोन महिन्यांपासून देशात अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांना अचानक आग लागल्याच्या घटना घडत आहेत. या दुर्घटनेत आर्थिक नुकसानाबरोबर अनेकजणांना गंभीर दुखापत झाली आहे तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावर, आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे.
नितीन गडकरी यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या आगीच्या घटनांबाबत आता चौकशी केली जाणार आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षेबाबतचे निकष कंपन्यांकडून पाळले गेले नसेल तर अशा कंपन्यांवर कडक कारवाई होणार आहे, अशी माहिती गडकरींनी ट्विट करत दिली आहे.
तसेच म्हणाले, घडलेल्या घटनांमध्ये काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. हे सर्वात दुर्दैवी आहे. या घटनांची चौकशी करण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी आम्ही तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे.
या समितीच्या अहवालाच्या आधारे आम्ही दोषी असलेल्या कंपन्यांना आवश्यक ते आदेश जारी करू. त्याप्रमाणे आम्ही लवकरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी गुणवत्ता-केंद्रित मार्गदर्शक तत्त्वे जारी करू. तसेच कोणत्याही कंपनीने इलेक्ट्रिक वाहन निर्मितीच्या प्रक्रियेत निष्काळजीपणा केल्याचे आढळून आल्यास त्या कंपनीला मोठा दंड आकारला जाईल. असे म्हणाले.
https://twitter.com/nitin_gadkari/status/1517120526472597504?t=gjkV5loHchm_amqx82npDA&s=19
कंपन्यांवर नाराजी व्यक्त करत म्हणाले, ज्या कंपनीच्या गाड्यांत दोष आढळतील त्या कंपनीला सर्व सदोष वाहने परत मागवण्याचे आदेशही दिले जातील, अशा कडक शब्दांत गडकरींनी इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांना आवाहन केलं आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांची झोप नक्कीच उडल्याचे चिन्ह दिसत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुण्यात ओला इलेक्ट्रिक स्कुटरला आग लागल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला होता. 26 मार्च रोजी तामिळनाडूतील वेल्लोरमध्ये चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरचा स्फोट झाला होता. एकीकडे पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे लोक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास पसंती देत आहेत, मात्र अशा घटनांमुळे त्यांच्यापुढे वाहने खरेदी करण्यासाठी आता प्रश्न पडत आहेत.