इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2022 ला सुरुवात झाली आहे. आयपीएलच्या खास वैशिष्ट्यांमुळे क्रिकेट चाहते आयपीएल पाहण्यासाठी सतत उत्सुक असतात. मात्र, याच आयपीएलमध्ये आर्थिक उलाढाल नेमकी कशी होते? आयपीएलचं अर्थकारण नेमकं कसं चालतं हे जाणून घेण्याची उत्सुकता देखील क्रिकेट प्रेमींना असते.
आयपीएल आणि आर्थिक उलाढाल याचा अतिशय जवळचा संबंध आहे. आयपीएल मधून होणारी कमाई हा खरं तर सर्वसामान्य क्रीडा रसिकांसाठी चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय आहे. आज आपण आयपीएलचं अर्थकारण नेमकं कसं चालतं? बीसीसीआय आणि टीमची कमाई नेमकी कशी होत असते ? याबद्दल जाणून घेणार आहोत.
माहितीनुसार, आयपीएलचा संपूर्ण खेळ हा एक व्यवसाय आहे. यातल्या प्रत्येक भागातून बीसीसीआय आणि विविध टीमच्या मालकांना प्रचंड महसूल मिळत असतो. आयपीएल मधील कमाई ही तीन भागात विभागली जाते. यात प्रामुख्याने प्रमोशन आणि जाहिरात तसेच सेंट्रल आणि लोकल महसुलाचा समावेश असतो.
आयपीएल मध्ये ज्या टीम्स असतात, त्यांना जाहिराती आणि प्रमोशन्सच्या माध्यमातून मिळणाऱ्या कमाईचा वाटा हा सुमारे 20 ते 30 टक्के एवढा असतो. तसेच यातून उत्पन्न मिळवण्यासाठी टीम्सचं स्वतः चं बिझनेस मॉडेल असतं. या मॉडेल अंतर्गत या वेगवेगळ्या टीम्स कंपन्यांशी करार करत असतात.
यामध्ये विविध कंपन्या क्रिकेटर्स आणि अंपायरच्या जर्सी, हेल्मेट, वरती कंपन्यांची नावं, लोगो देण्यासाठी टीम्सना पैसे देते. एवढेच नाही तर विकेट, ग्राउंड आणि सीमारेषेवर दिसणाऱ्या कंपन्यांची नावं आणि लोगो इत्यादींसाठी कंपन्या टीम्सना पैसे देतात. त्याचप्रमाणे टीम क्रिकेटरकडून दुसऱ्या ब्रँडच्या देखील जाहिराती करून घेतल्या जातात.
यामध्ये काही खेळाडू आपल्या टीम्सच्या ब्रँडचं प्रमोशन देखील करतात. जर, मुंबई इंडियन्स टीम असेल तर त्या खेळाडूंच्या जर्सी, कॅप्स, हेल्मेटवरती सहसा जिओचा लोगो असतो. यातून ते जिओचं प्रमोशन करतात. त्यामुळे रोहित शर्मासह मुंबई इंडियन्सचे अनेक खेळाडू यांच्या जर्सीवरती असा लोगो पाहायला मिळतो.
तसेच आर्थिक उलाढालीचा दुसरा मार्ग म्हणजे ग्राऊंडवर विक्री होणारी तिकीटं. एकूण उत्पन्नापैकी सुमारे 10 टक्के उत्पन्न यातून मिळते. एका सामन्यावेळी विकल्या गेलेल्या तिकीटांवर 4 ते 5 कोटी पर्यंत विक्री होते. यातील 80 टक्के रक्कम स्थानिक टीमला मिळते. तसेच आयपीएल टीम्सचा सर्वात महत्वाचा स्रोत म्हणजे, सेंट्रल रेव्हेन्यू होय. हे उत्पन्न ‘आयपीएल’च्या एकूण कमाईच्या सुमारे 60 ते 70 टक्के आहे.