पोलिसांसमोर पळून जाणं संदीप देशपांडेंना पडणार महागात, गृहमंत्रालयाने दिले ‘हे’ आदेश

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबईतील मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. त्यानंतर मनसेच्या अनेक नेत्यांवर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांना आज मुंबई पोलीस अटक करण्यासाठी प्रयत्न आले होते.

त्यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पोलिसांना चकवा दिला आणि त्या ठिकाणाहून पळ काढला. यामुळे काही वेळ पोलिसांचा गोंधळ उडाला होता. आता हे प्रकरण देशपांडे यांच्या अंगलट येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्याच्या गृहमंत्रालयाने थेट देशपांडे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणाची दखल घेत गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी मुंबई पोलिसांना आदेश दिले आहेत. ते म्हणाले, देशपांडे यांनी मुंबई पोलीस दलातील महिलेशी केलेल्या गैरवर्तनाची माहिती मी घेतली आहे. या घडलेल्या प्रकाराबद्दल तात्काळ कारवाई करा, असे आदेश मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

याचबरोबर या घडल्या प्रकाराबद्दल देशपांडे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असे देखील सांगितले जात आहे. यामुळे आता देशपांडे यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस कालपासून मनसे नेते संदीप देशपांडे यांचा शोध घेत होते.

वाचा नेमकं घडलं काय..? आज सकाळी मनसे नेते संदीप देशपांडे शिवाजी पार्क परिसरात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत मनसे नेते संतोष धुरी देखील होते. मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाणार होते. त्यापूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

संदीप देशपांडे हे शिवाजी पार्क परिसरात असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. त्यानंतर मुंबई पोलीस तातडीने शिवाजी पार्क परिसरात दाखल झाले आणि त्यांनी मनसे नेते देशपांडे यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस अधिकारी संदीप देशपांडे यांना पोलीस व्हॅनकडे घेऊन जात होते.

त्यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे घुमजाव करत पोलिसांना त्यांच्या गाडीकडे घेऊन गेले. त्यानंतर संदीप देशपांडे यांनी गाडीत बसून त्या ठिकाणाहून पळ काढला. यावेळी पोलिसांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांना त्यांना अटक करता आली नाही.

महत्त्वाच्या बातम्या
भोंगे हटवण्यासाठी मनसेनं उचललं ‘हे’ डिजिटल पाऊल, ठाकरे सरकारची करणार कोंडी
VIDEO: मुलीला छेडणं कपील शर्माला पडलं महागात, कपिलच्या दिली कानाखाली, वाचा संपूर्ण प्रकरण
…अन् डिलिव्हरी बॉयला ‘त्या’ अवस्थेत पाहून पोलिसांच्या हृदयाला पाझर फुटला; वाचा नेमकं काय घडलं
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या हस्ते प्राजक्ता माळीला मिळाला ‘हा’ पुरस्कार; पोस्ट शेअर करत म्हणाली,…