एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात शिवसेना नेमकी कोणाची यावरून सुरू असलेला वाद न्यायालयात आणि नंतर निवडणूक आयोगाकडे पोहोचला आहे. निवडणूक आयोगाने काल उद्धव ठाकरे गटाला नवीन चिन्ह आणि नाव तर शिंदे गटाला नाव दिलं आहे.
उद्धव ठाकरे गटाला चिन्ह म्हणून ‘धगधगती मशाल’ मिळाली आहे. यावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या ‘मशाल’ या चिन्हाचा आणि शिवसेनेचा एक जूना इतिहास आहे. या चिन्हासोबत शिवसेनेचं नातं नेमकं काय होतं ? याबद्दल माहिती घेऊ.
तर, शिवसेना आणि मशालीचा इतिहास म्हणजे याआधी देखील शिवसेनेकडे मशाल हे चिन्ह होतं. छगन भुजबळ नगरसेवक पदासाठी १९८५ साली उभे असताना त्यांना मशाल हे चिन्ह मिळालं होते. तसेच २ मार्च १९८५ ला विधानसभेची निवडणूक झाली आणि भुजबळ मशाल चिन्हावर शिवसेनेचे एकमेव आमदार झाले होते.
तसेच १९८५ साली जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर महापालिका निवडणूक लढविण्याचे ठरविले त्यावेळी देखील त्यांना मशाल हेच चिन्ह मिळाले होते. या चिन्हावर निवडणूक लढवली आणि बाळासाहेब ठाकरे यांना मोठं यश मिळालं होतं. या चिन्हावर शिवसेनेचे ७४ नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेची महापालिकेत सत्ता आली.
त्यामुळे यापूर्वी देखील धगधगत्या मशालीने इतिहास घडविला होता अशा भावना आता शिवसैनिकांमधून व्यक्त होत आहेत. सध्या ठाकरे गटाला मिळालेल्या या चिन्हामुळे यापूर्वीच्या शिवसेनेच्या मशाल चिन्हाची नव्याने चर्चा होत आहे. शिवसेनेने देखील त्यांच्या ट्विटर हँडलवर ठाकरे गटाचा हा लोगो शेअर केला आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळालेलं आहे. तर, ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे. शिंदे गटाला चिन्हांसाठी पर्याय सादर करण्यास सांगितलं आहे. त्यावर आज शिंदे गट कोणते चिन्ह घेईल पाहावं लागेल.