Share

Raygada : रायगडावर पिंडदान करू देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना मैदानात, म्हणाल्या त्यात गैर काय?

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोरच पिंडदानाचा कार्यक्रम सुरू असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावरून राजकारण तापलं आहे. संभाजी ब्रिगेड संस्थेकडून याविरोधात आक्षेप नोंदवला गेला आहे. यावर आता हिंदुत्ववादी संघटनांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रायगडावर पिंडदान करण्यात गैर काय? असा उलट सवाल हिंदुत्ववादी संघटनांनी संभाजी ब्रिगेडला केला आहे. काही शिवभक्तांनी म्हटलं आहे की, पिंडदान हा हिंदू संस्कृतीचा भाग आहे. हिंदू धर्मात पक्षात सर्व पितरांचे तर्पण करण्याची पद्धत आहे.

पिंडदान ही घरोघरी प्रथा पाळली जाते. त्यामुळे रायगडावर पितरांचे पिंडदान करण्यात गैर काय?असा सवाल काही शिवभक्तांनी, हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. गडांवरील हिंदू विधींना विरोध करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी स्पष्टीकरण दिलं आहे की, किल्ले रायगडावर राम धुरी आणि त्यांचे सहकारी २००८ पासून हा विधी करत आहेत. रायगडाचे रक्षण करताना शस्त्राने घायाळ होऊन वीरमरण आलेल्या मावळ्यांचे स्मरण म्हणून हा पिंडदान विधी केला जातो.

पिंडदान हा हिंदू संस्कृतीचा भाग आहे. त्यावर संभाजी ब्रिगेड संस्थेकडून घेतला जाणार आक्षेप दुर्दैवी आहे असे स्पष्टीकरण हिंदुत्ववादी संघटनांनी दिलं आहे. संभाजी ब्रिगेडनी पिंडदानाची पार्श्वभूमी आणि हेतू जाणून घेतला असता तर हा गोंधळ झाला नसता असेही हिंदुत्ववादी संघटना म्हणाल्या.

याप्रकरणी सविस्तर माहिती म्हणजे, रायगडावर संभाजी ब्रिगेडनं शनिवारी शाक्त पद्धतीनं शिवराज्याभिषेक दिन साजरा केला. या कार्यक्रमाला ब्रिगेडच्या राज्यभरात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यानंतर ते ब्रिगेडचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी गडावर गेले असता त्यांना तिथं काही लोक पिंडदान करत असल्याचं लक्षात आलं.

समाधीस्थळावर पिठाचे गोळे, फुले आणि इतर साहित्‍य पाहून शिवभक्तांनी पिंडदान करणाऱ्या लोकांना जाब विचारला. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. परंतु तिथं उपस्थित असलेल्या काही लोकांनी या घटनेचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींनी, संभाजी ब्रिगेडने संताप व्यक्त केला आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now