राजस्थानमधील राजकीय वातावरण तापलं आहे. इथे मुख्यमंत्रीपदावरुन पुन्हा नव्या वादाला सुरुवात झाली आहे. सचिन पायलट मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होऊ लागल्याने अशोक गेहलोत समर्थक ९२ आमदार नाराज झाले आहेत. आमदारांनी राजीनामे देखील लिहिले आहेत.
नुकतीच मंत्री शांती कुमार धारीवाल यांच्या घरी अशोक गहलोत यांच्या गटाच्या आमदारांची बैठक पार पडली. त्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून सचिन पायलट यांच्या नावाची चर्चा झाली. त्यावरुन अशोक गेहलोत समर्थक ९२ आमदार नाराज झाले आहेत. नाराज आमदारांनी राजीनामे देखील लिहिले आहेत.
हे आमदार राजीनामे घेऊन विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांच्या घरी पोहोचले आहेत, अशी माहिती मिळत आहे. संबंधित बैठकीत राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार तर, सचिन पायलट मुख्यमंत्री होणार असं ठरवलं जात होतं.
दरम्यान, अशोक गहलोत यांच्या गटाच्या आमदारांची बैठक झाल्यानंतर, शांती धारिवाल यांच्या घरातून बाहेर पडताना मंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांनी प्रतिक्रिया दिली. कोणत्याही अटीवर सचिन पायलट हे मुख्यमंत्री म्हणून मान्य नाहीत, असे प्रतापसिंह म्हणाले.
सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीपद देण्यावरून सर्व आमदार संतापले आहेत, असे प्रतापसिंह म्हणाले. तसेच सचिन पायलट यांनी भाजपसोबत मिळून सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही भाजपचा कट यशस्वी होऊ देणार नाही, सर्वजण राजीनामे द्यायला निघालो आहोत असेही प्रतापसिंह खाचरियावास यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे, अशोक गेहलोत यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. अपक्ष आमदार संयम लोढा यांनी म्हटलं आहे की, आम्ही अशोक गेहलोत यांच्या सोबत आहे. अशोक गेहलोत यांनी आमदारांच्या भावनेनुसार निर्णय घेतला नाही तर सरकार पडेल असे लोढा म्हणाले.