गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या अंत्यदर्शनावेळी राजकारण, मनोरंजन, क्रीडा, संगीत, उद्योग अशा क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी शिवाजी पार्क येथे उपस्थित होते. पण यावेळी एकही मराठी कलाकार दिसला नाही, असे म्हणत काही नेटकऱ्यांनी मराठी कलाकारांना ट्रोल करत होते. त्यानंतर अशाच एका नेटकऱ्याच्या पोस्टवर अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) कमेंट करत लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनाला मराठी कलाकार उपस्थित नसण्यामागचे स्पष्टीकरण दिले.
त्यानंतर हेमांगीच्या या कमेंटची सर्वत्र चर्चा सुरु झाली. प्रसार माध्यमांमध्ये तिच्या या कमेंटबाबत अनेक बातम्या समोर आल्या. त्यानंतर आता हेमांगीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत प्रसारमाध्यमामध्ये तिच्या एका कमेंटमधून हवा तो अर्थ काढण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच लतादीदींच्या अंत्यदर्शनावेळचा संपूर्ण घटनाक्रम तिने आपल्या या पोस्टद्वारे सांगितला आहे.
हेमांगीने लिहिले की, परवा मयूर अडकरच्या पोस्टवर खरंतर विचारलेल्या प्रश्नावर मी कमेंट केली. मला आलेला अनुभव शेअर केला. स्वतंत्र पोस्ट लिहिली नाही. त्या कमेंटमध्येही मी गायक जे हिंदीत प्रसिद्ध आहेत शान, मिका सिंग, शैलेंद्र सिंग, कैलास खेर, कविता पौडवाल, मराठीतले गायक बेला शेंडे, नंदेश उमप यांना जवळून दर्शन मिळावं म्हणून खूप प्रयत्न करावे लागले जे सहजरित्या मिळू शकत होतं, हे नमूद केलंय.
‘यात कुठेही पोलिसांनी हिंदी आणि मराठी असा फरक केला नाही. आणि जर केला असेल तर तो फरक बॉलिवूड किंवा हिंदीत काम करणाऱ्यांनी केला का? तर नाही! पोलिसांना वाटलं अमुक अमुक लोकांना पाठवायला हवं, त्यांच्या मनाला वाटलं त्या लोकांनाच सहजपणे शेवटचं दर्शन घेऊ दिलं. किंवा त्यांच्यासाठी तशी सोय करण्यात आली असावी. हिंदीतल्या लोकांना आत सोडा आणि मराठीतल्या लोकांना नको, असा काही निकष त्यांनी केला नाही. थोडक्यात मेरे मन को भाया….’
‘माझी कलाकार म्हणून ओळख पटूनही हिंदीतल्या लोकांनी नाही तर मराठी असलेल्या आणि ओळखत असलेल्या मराठी पोलिसांनी मला आत जाण्यास मनाई केली. ही चूक हिंदी बॉलिवूडची? शाहरूख नसेल म्हणाला ना या मराठी लोकांना आत सोडू नका बरं. राजकारण क्षेत्रातील आणि शासकीय मंडळींमुळे, त्यांच्या सुरक्षा कारणांमुळे मनाई केली. बरं त्यातही या लोकांसाठी वेगळी सोय केली असताना सर्व गेटवर मनाई केली. ती का केली? हे पोलिसच चांगल्या प्रकारे सांगू शकतात’.
https://www.facebook.com/hemangii.kavidhumal/posts/5392491960770389
‘प्रयत्नांती आत गेल्यावर पाहिलं तर तिथले पोलिस हिंदीतल्या गायक मंडळींनासुद्धा सतत मागे जाऊन बसायला सांगत होते आणि या हिंदी गायकांनाही शेवटपर्यंत थांबूनच ठेवण्यात आलं. हिंदीतल्या विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूरलाही इतर बॉलिवूड अभिनेत्यांसारखा थेट प्रवेश दिला नाही, थांबवून ठेवलं’.
‘उशिराने आलेल्या आमिर खान, त्याची मुलगी, रणबीर कपूर, शंकर महादेवन यांना मात्र आमच्या अगदी बाजूने थेट आत सोडण्यात आलं. त्यामुळे सगळाच सावळा गोंधळ होता. कोव्हिडमुळे तशीही फार गर्दी नव्हती. सगळे सौजन्याने वागत होते. शांतीपूर्ण वातावरण होतं. सहज दर्शन मिळू शकलं असतं. पण नाही’.
‘तुम्ही कुणीही सेलिब्रिटी असला तरी आत तुम्हांला जाऊ देणार नाही म्हणत दोन महिला पोलीस अधिकारी एकमेकींना टाळी देत हसल्या. तिथे काही हिंदीतल्या कलाकारांना जाऊ दिलं आणि आम्हांला पुन्हा अडवलं तेही मराठी पोलिसांनी! यात चूक त्या हिंदी कलाकारांची?’
‘गोष्ट जेव्हा भांडणापर्यंत पोचली तेव्हा आम्हांला लताजींच्या पार्थिवाजवळ जाऊ देण्यास वाट मोकळी झाली. पार्थिवाजवळ पोचल्यावर ना कुणी अडवलं ना हटकलं. अगदी घरच्या मंडळींप्रमाणे दर्शन घेऊ दिलं. हवा तितका वेळ थांबू दिलं! मंगेशकर कुटुंबियांसोबत उभं केलं. पण गेटपासून ते इथपर्यंत जो काही प्रकार झाला तो म्हणजे ‘चाय से ज्यादा किटली गरम’ हाच होता!’
‘मी या प्रकाराकडे वरून आलेले आदेश पोलीस पाळत होते आणि सरकारी प्रोटोकॉल्स याच अर्थाने पाहिलंय. पोलिसांनी हिंदी मराठी दोन्ही गायक कलाकारांपेक्षा नेते मंडळी, शासकीय लोकांना झुकतं माप दिलं गेल्याचं दिसलं हे मात्र तेवढंच खरं! कलाकारांच्या भावनेपेक्षा नेते मंडळींची सुरक्षा महत्वाची वाटली याला बॉलिवूड कसं जबाबदार?’
‘बाकी काल सर्व प्रसार माध्यमांमध्ये माझ्या एका कमेंटमधून त्यांना हवा तो अर्थ काढून ‘मराठी कलाकारांना डावलण्यात आलं’, प्रवेश दिला नाही’ वगैरेच्या बातम्या तयार झाल्या त्याचं हे विश्लेषण’, असे हेमांगीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
लता मंगेशकरांच्या अंत्यसंस्काराला मराठी कलाकार का उपस्थित नव्हते? हेमांगी कवीने दिले स्पष्टीकरण
अखेर ठरलं! रणबीर कपूर आणि आलिया भट्ट बांधणार लग्नगाठ? ‘या’ ठिकाणी होणार थाटामाटात लग्न
मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीने साजरी केली पहिली संक्रात, मराठमोळ्या अवतारातील फोटो व्हायरल