काल पुण्यात दिवसभराच्या विश्रांतीनंतर रात्री विजेच्या कडकडाटसह पावसाने हजेरी लावली. साधारण रात्री ९:३०च्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे काही वेळातच शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते.
नारायण पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर या उपनगरात देखील पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. एवढेच नाही तर बिबवेवाडी परिसरात ढगफुटी सारखा पाऊस झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.
पिंपरी चिंचवड भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते त्यामुळे नागरिकांना बाहेर पडणे अवघड झाले होते. शहरातील सिंहगड रस्ता परिसरात देखील अति मुसळधार पाऊस झाला. पुण्यात अचानक पाऊस आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसली.
रात्रीच्या अचानक पडलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली. अनेकजण पाणी साचल्याने रस्त्यावरच अडकून पडल्याचे पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी रस्त्यांवर कंबरे एवढे पाणी साचल्ये असून नागरिकांना वहाने काढणे अवघड झाले.
दरम्यान, रात्रीच्या मुसळधार पावसामुळे शहरात तीन ठिकाणी पाणी शिरण्याच्या घटना घडल्या तसेच पुणे-सोलापूर रस्त्यावर आकाशवाणी परिसरात झाड कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. तर, कोंढव्यातील येवलेवाडी स्मशानभूमी परिसर, बिबवेवाडी-सुखसागरनगर भागातील अंबामाता मंदिर, कोंढवा परिसरातील एनआयबीएम रस्ता परिसरात पाणी शिरण्याच्या घटना घडल्या.
बिबवेवाडी अप्पर परिसरात तर ढगफुटी झाली असून नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याची माहिती समोर येत आहे. तसेच अनेक ठिकाणी झाड पडीच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे पावसाचा अंदाज पाहता रात्रीच प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले होते.