तो खुप लढवय्या माणूस, मागे हटणार नाही; राऊतांनी केले भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचे कौतूक

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलंच गढूळ झालं आहे. मनसे, भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून एकमेकांवर आरोपप्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. त्यातच भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला केलेल्या विरोधामुळे राजकारण अधिक तापलं.

भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला केलेल्या विरोधावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बृजभूषण यांचे कौतूक केले आहे. आज दिल्लीत बोलत असताना त्यांनी राज ठाकरेंना आयोध्या दौऱ्यावरून टोला लागवत बृजभूषण यांचे लढवय्या माणूस म्हणून कौतूक केले.

संजय राऊत म्हणाले, बृजभूषण शरण सिंह हे त्यांची भूमिका मांडत आहेत. बृजभूषण सिंह यांना मी अनेक वर्ष ओळखतो. तो माणूस लढवय्या आहे. त्यांचे महाराष्ट्राशी संबंध फार जुने आहेत. आम्ही त्यांना नेताजी म्हणतो. ते स्वत: पैलवान आहेत. अनेक कुस्तीगीर त्यांनी निर्माण केले.

तसेच म्हणाले, आम्ही एकत्र काम केले आहे तो माणूस मागे हटणार नाही असं वाटतं अशा शब्दात त्यांनी बृजभूषण शरण सिंह यांचे कौतुक केले आहे. यावेळी खासदार संजय राऊत यांनी अयोध्या दौऱ्यावरून राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी आधी उत्तर भारतीयांना विरोध करत मराठी माणसाचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र आता त्यांनी भूमिका का बदलली हे मला माहीत नाही. ते एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले आणि अयोध्येला निघाले, असं वक्तव्य करत राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

तसेच मनसे आणि भाजपवर टीका करताना म्हटले की, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढायला हवी परंतु भाजपाकडून 2024 ची तयारी सुरू आहे. महागाईवर कोणी बोलत नाही. बेरोजगारीवर कोणी बोलत नाही. फक्त मशीद, मंदिर यावर निवडणुका लढवल्या जात आहेत असे संजय राऊत म्हणाले.