काल 8 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे आंदोलन केले. या निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल फेक केली. यावर आता एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अँड गुणरत्न सदावर्ते यांनी सुप्रिया सुळे आणि इतरांची लाय डिटेक्टर चाचणी करा अशी मागणी केली आहे.
अँड गुणरत्न सदावर्ते म्हणाले, जी घटना घडली त्याची माहिती मला न्यायालयात असताना मिळाली. शरद पवारांच्या निवासस्थानी कोणी गेलं, आंदोलन कोणी केलं याची माहिती नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि इतरांची लाय डिटेक्टर चाचणी करा.
गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या संपावर न्यायालयाने कष्टकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. शरद पवारांनी आतापर्यंत जातीय आणि गलिच्छ राजकारण केलं आहे, असे म्हणत आता अँड जयश्री पाटील यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोपही गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
तसेच, ‘कष्टकरी हे कधीही कुणावर हल्ला करत नाहीत. हल्ला केला असं शरद पवारांनीही कुठेही म्हटलं नाही. मलाही कुठेही तसं कोणी हल्ला केल्याचं दिसलं नाही. त्यामुळे या कष्टकऱ्यांना बदनाम करू नका.’ असे अँड गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
या सर्व घटनेवर राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील आपली प्रतिक्रिया देत अँड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आरोप केला आहे. म्हणाले, आज पवारांच्या घरावर जो काही हल्ला झाला तो दुर्दैवी आहे. या सगळ्या कामगारांना उसकवण्याचं काम ज्यांनी केलं, त्या गुणरत्न सदावर्तेंची भाषणं तपासली जावीत. असे ते म्हणाले.
दरम्यान, या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये ही अशी पहिलीच घटना घडली असेल. माझ्या घरावर जो हल्ला झाला तो अत्यंत दुर्दैवी आहे. पण तरीही आम्ही आंदोलन करणाऱ्या आंदोलकांशी चर्चा करायला तयार आहोत. या गोष्टी आंदोलन करुण किंवा चप्पल फेकून सुटणाऱ्या नाहीत, या गोष्टी केवळ चर्चेच्या माध्यमातून सुटतील.