भाजप नेते मोहित कंबोज यांनी काल तीन ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला. त्यात आज त्यांनी आणखी एक केलेले ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी “हर हर महादेव! अब तांडव होगा!” असे ट्विट केले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
सध्या राज्यात महाविकास आघाडीच्या काही नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू आहे. राज्यात ईडी अँक्टिव्ह झाली आहे. विरोधीपक्षातील नेते त्यांच्या निशाण्यावर आहेत. नुकतंच शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना ईडीने अटक केली. त्यामुळे आता ईडीच्या रडारवर पुढे कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
त्यात मोहित कंबोज यांनी कालपासून ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. कंबोज यांनी काल ट्विट केलं ते राष्ट्रवादीची धाकधूक वाढणारं आहे. त्यांच्या या ट्विटमधून राष्ट्रवादीला ‘बॅड मॉर्निंग’ म्हटल्याचं दिसत आहे. कालपासून त्यांच्या ट्विटची चर्चा आहे.
त्यांनी ट्विट केले होते की, ‘माझं हे ट्विट सेव्ह करुन ठेवा! अनिल देखमुख, नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा’, असा इशारा देणारं ट्विट कंबोज यांनी केलं.
https://twitter.com/mohitbharatiya_/status/1559730590043103232?t=ZIZ_O2pLJwewNMEZqUEovA&s=19
त्यांच्या या ट्विटने जेलमध्ये जाणारा राष्ट्रवादीचा तिसरा नेता कोण असा प्रश्न चर्चेत आला आहे. तर दुसरीकडे पुढे घडणाऱ्या घडामोडी कंबोज यांना आधीच कशा माहिती होतात असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी ईडीकडून चौकशी सुरु आहे.
शरद पवार यांच्यासह अजित पवारांचीही ईडीकडून चौकशी सुरु आहे. तर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचीही सीजे हाऊसमधील पुनर्बांधणी प्रकरणी चौकशी सुरू आहे. पटेल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे कंबोज सुचवू पाहणारे राष्ट्रवादीचे मोठे नेते प्रफुल्ल पटेलच असल्याची जोरदार चर्चा आहे.






