सध्या महाराष्ट्र राज्यात मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन सुरु आहे. तर दुसरीकडे, श्रीराम सेनेच्या प्रमुखांनी 9 मे पासून पहाटे 5 पासून कर्नाटक राज्यातील मंदिरामध्ये अजानपेक्षा जास्त आवाजात हनुमान चालिसा म्हणण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.
श्रीराम सेनेचे राष्ट्रीय प्रमुख प्रमोद मुतालिक बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, 9 मे पासून पहाटे 5 पासून कर्नाटक राज्यातील मंदिरामध्ये अजानपेक्षा जास्त आवाजात हनुमान चालिसा म्हणण्यात येईल. त्यांच्या या विधानाने आता आणखी एकदा राजकीय वातावरण तापणार असल्याची चिन्हे दिसत आहे.
यावेळी, प्रमोद मुतालिक म्हणाले, राज्यातील हिंदू मंदिरात भजन व हनुमान चालिसा ही मुस्लिमांच्या अजाणपेक्षा दुप्पट आवाजात म्हणण्यात येणार आहे. आपला अजानला विरोध नसून त्यामुळं होणाऱ्या कर्णकर्कश आवाजामुळं होणाऱ्या त्रासाला विरोध आहे. यामुळं कर्नाटकात देखील माईक जप्तीची कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
त्यांनी हिंदू आणि मुस्लिम मतदानाबाबत आपलं मत व्यक्त करत भाजपला सवाल देखील केला आहे. भाजप सरकारनं मुस्लिमांच्या माईक विरोधात कारवाई केली नाही, तर तुमचे 150 चे मिशन साकार होणार नाही. मुस्लिमांचे एकही मत भाजपला पडत नाही, तरी देखील त्यांची पर्वा का? असे श्रीराम सेनेचे प्रमुख म्हणाले.
श्रीराम सेनेचे राष्ट्रीय प्रमुख प्रमोद मुतालिक यांच्या विधानाने आता आणखी एकदा राजकीय, आणि सामाजिक वातावरण खराब होणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, राज्यात 4 मे पासून अनेक ठिकाणचे मशिदींवरील भोंगे बंद करण्यात आले आहेत. ढवळलेले वातावरण कुठे तरी शांत होत असताना आता आणखी एक आव्हान बेळगावच्या निमित्ताने पुढे आले आहे.
येत्या काळात हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंगे हे मुद्दे घेऊन हिंदू आणि मुस्लिम यांच्यात वाद निर्माण होऊन, मोठ्या दंगलीला तर सामोरे जावे लागणार नाही ना याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे राजकारणात मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा हे मुद्दे आणखी किती दिवस चालतात हे पाहणं आवश्यक राहील.