Share

मनसैनिकांनी केले राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन, राज्यात ठिकठिकाणी पहाटे हनुमान चालिसाचे पठण

राज्यात भोंग्यांच्या मुद्यावरुन वातावरण तापलेले दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच मशिदींवरील भोंगे खाली घ्या नाही, तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवली जाईल, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. (hanuman chalisa in front of mosqoue)

त्यानंतर मंगळवारी राज ठाकरेंनी तीन पानांचे पत्र सादर करत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी देशातील तमाम हिंदू बांधवांना विनंती केली आहे की, ४ मे पासून जिथे जिथे भोंगे लागती तिथे तिथे भोंग्यावर हनुमान चालिसा लावावी. ज्यामुळे भोंग्यांचा काय त्रास होतो हे त्यांनाही समजायला हवे, असे सांगितले होते.

राज ठाकरेंनी यावेळी जनतेला तीन आवाहनेही केली आहे. एक म्हणजे त्यांना आपली हनुमान चालीसा ऐकवा. दुसरे म्हणजे सर्व स्थानिक मंडळांनी आणि सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि स्वाक्षऱ्यांची निवेदन पत्रे रोजच्या रोज पोलीस ठाण्यात नेऊन द्यावीत. तसेच तिसरे म्हणजे मशिदींमध्ये बांगेला सुरुवात झाल्या झाल्या पोलिसांसाठीच्या १०० या क्रमांकावर सजग नागरिकांनी दूरध्वनी करून भोंग्यांचा त्रासाबाबत तक्रार करावी. रोज करावी.

त्यामुळे बुधवारी काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण आता मनसैनिकही राज ठाकरेंच्या आदेशांचे पालन करताना दिसून आले. पहाटेच्या अजानच्यावेळी मनसे कार्यकर्ते हनुमान चालिसाचे पठण करताना दिसले. कांदिवलीच्या चारकोप भागात असणाऱ्या मशिदींवरील अजान सुरु होताच हनुमान चालिसा लावण्यात आली.

वाशिममध्येही अजान सुरु होताच हनुमान चालिसा लावण्यात आली. नवी मुंबईतही हनुमान चालिसा लावण्यात आली. तर ३ मे रोजी रात्री उशिरापर्यंत मनसैनिकांनी दर्ग्यासमोर हनुमान चालिसा लावली होती. यावेळी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.

राज ठाकरेंच्या आदेशानुसार जळगावात मनसैनिकांनी आज सकाळी सहा वाजेपर्यंत शनी मंदिरात आरती करत हनुमान चालिसा म्हटली. या कार्यक्रमासाठी मनसैनिकांनी पोलिसांची परवानगी घेतली होती. पोलिसांनी आखून दिलेल्या नियमांनुसार मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

दरम्यान, आज पहाटेपासून मशिदींवरील भोंग्यांचा आवाज आलेला नाही. डोंबिवली-कल्याणमधील मशिंदींची अजान आज भोंग्यांविनाच पार पडली, असा दावा मनसैनिकांनी केला आहे. तसेच कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त केला आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now