सध्या महाराष्ट्र राजकारणात हनुमान चालिसा आणि भोंग्यांबद्दल वाद सुरू आहे. यावर, आता मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे यांनी आपली भूमिका मांडली आहे. नुकताच शहीद भगतसिंग विचारमंच आयोजित सातवा नास्तिक मेळावा पुण्यात पार पडला, यावेळी ते बोलत होते.
अॅड. असीम सरोदे म्हणाले, हनुमान चालिसा म्हणायचा आहे तर स्वतःच्या घरात म्हणा, हवे तर स्वतःच्या अंगणात म्हणा. दुसऱ्याच्या दारात जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट का, असा सवाल त्यांनी केला. तसेच दुसऱ्याच्या दारात हनुमान चालिसा म्हणण्यात देव नाही, तर राजकारण आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
तसेच म्हणाले, ज्यांना राजकारणालाच देव मानायचं असेल तर काहींनी त्यात आनंदी रहावं. मानसिक आधारासाठी देव मानण्याचा हक्क लोकांना आहे. मात्र, आज सुरू असलेल्या राजकारणातून देव संकल्पनेमुळे साधली जाणारी आत्मिक उन्नती साधली जाणार नाही.
यावेळी त्यांनी सरकारी कार्यालयांमधील सर्वधर्मीय पूजा बंद झाल्या पाहिजेत. पोलीस सरकारी गाड्यांमध्ये जे देव देवतांचे फोटो, मूर्ती लावतात, हे सुद्धा बंद झालं पाहिजे यासाठी जनहित याचिका दाखल करण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे.
म्हणाले, आज देवाच्या नावाने अविचाराचे दर्शन सुरू आहे. यातून गुंड बदमाशांचं राजकारण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला आपण विरोध करतो म्हणूनही काही लोकांचा नास्तिक मेळाव्याला विरोध आहे. देव ही संकल्पना अनेकांच्या राजकारणाचं भांडवल आहे.
त्यामुळे देव नाही म्हटलं की त्या राजकारण्यांना झटका बसतो. कारण, देव राहिला नाही, तर त्यांचं राजकारणच उरणार नाही, आणि ही गोष्ट पंतप्रधान, गृहमंत्री यांना माहिती आहे. असे असीम सरोदे म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांना देखील नाव न घेता टोला लगावला.
म्हणाले, जे नास्तिक आहेत असे सांगितले गेले त्यांची मुलगी म्हणते, आम्ही देवळात जातो. मग देवळात गेलेले जुने फोटो पुढे आणले जातात. निवडणुकीच्या वेळी आम्ही देवळात नारळ फोडतो, पण त्याचा गाजावाजा करत नाही. असं म्हणत सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.