आज मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ निवासस्थानावर चप्पल आणि दगडफेक केल्याच्या घटनेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. शरद पवारांच्या घरावर हल्ला प्रकरणी चौकशी होणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी सांगितले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता राज्यभर चाललेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातील आंदोलकांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांची चौकशी होणार आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे. दरम्यान त्यांच्या घरी रात्री अचानक पोलिस दलातील ४-५ कर्मचाऱ्यांनी धाड टाकली.
राहत्या घरातून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, साधारण ७.३० वाजताच्या सुमारास ४ ते ५ पोलीस सदावर्ते यांच्या घरी पोहोचले होते. त्यानंतर त्यांना घेतले. शरद पवार यांच्या घराबाहेर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सदावर्ते यांची चौकशी करणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “माझी हत्या होऊ शकते”, असा खळबळजनक दावा सदावर्ते यांनी माध्यमांशी बोलताना केला. पुढे ते म्हणाले, मला नोटीस न देता अटक करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच दिलीप वळसे पाटील यांच्यावर माझ्या पत्नीने तक्रार दाखल केली आहे.” असं सदावर्ते पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर बोलले. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी वकील जयश्री पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया देत म्हणाल्या, ”कर नाही त्याला डर कशाला!”मी कपडे बदलत असताना महिला पोलीस माझ्या बेडरूममध्ये घुसल्या, माझ्या कुटुंबाला धोका असल्याच त्या म्हणाल्या.
दरम्यान, राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी आज पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक निवासस्थानाबाहेर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले.
आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकच्या आवारात घुसून पवार यांच्या निवासस्थानावर दगडफेक आणि चप्पलफेक केली. तसेच संपकरी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक घोषणाबाजी केली. एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावं या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट आक्रमक झालेला पाहायला मिळाला.