महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कोसळले असून, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेत आलं आहे. सत्ता बदलानंतर आता महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाला सत्तेसाठी ताण काढावा लागणार आहे.
आता राज्यात सत्तांतर झाले आणि सर्वच पक्षांनी स्वबळाच्या दृष्टीने नियोजन सुरू केले. भाजपला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली असून, त्याचे नेतृत्व महेश कोठे यांच्याकडे सोपविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या मित्रपक्षांतील नाराजांना आपल्या पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
महाविकास आघाडी नसल्याने राष्ट्रवादीने काँग्रेस, शिवसेनेतील नाराज भाजपमध्ये जाणार नाहीत, याची दक्षता घेत त्यांना राष्ट्रवादीने आपल्याच पक्षात ऑफर दिली आहे. दरम्यान, नवीन उमेदवार शोधून त्यांना निवडून आणण्यावर राष्ट्रवादीचा भर दिसत नाही.
नवीन उमेदवार शोधून त्यांना निवडून आणण्यासाठी ताण काढण्यापेक्षा यापूर्वीच्याच माजी नगरसेवकांना उमेदवारी दिल्यास ते सहजपणे विजयी होऊ शकतात, या हेतूने माजी नगरसेवकांना पक्षात घेऊन महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार आहे.
माहितीनुसार, काँग्रेसचे माजी महापौर ॲड. यू. एन. बेरिया, शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे, एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तौफिक शेख आणि वंचित बहुजन आघाडीचे माजी प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे या सर्वांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे तब्बल ३२ माजी नगरसेवक निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती घालतील, असा दावा त्या नेत्यांनी केला आहे.
त्यामुळे आता काँग्रेस, शिवसेना, एमआयएम ला खिंडार पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणाऱ्या नेत्यांनी त्यांच्या समर्थकांची नावे फायनल केली आहेत. पण, निवडणुकीपूर्वी राजकीय परिस्थिती पाहून त्यातील कितीजण आपल्या नेत्यासोबत पक्षांतर करतील, हे त्यावेळीच स्पष्ट होणार आहे.