दहीहंडी(Dahaihandi): नुकताच कृष्ण जन्माष्टमीचा सण पार पडला. जन्माष्टमी म्हटलं की दहीहंडीचा उत्सव हा थाटामाटात होणारच. गेल्या २ वर्षात कोरोनामुळं दहिहंडीचा कार्यक्रम झालेला नव्हता. त्यामुळे यावर्षी सर्वच गोविंदांना उत्साह होता. सर्वत्र दहीहंडी थाटामाटात साजरी करण्यात आली. याच उत्साहात काही गोविंदा जखमी झालेत तर काही गोविंदांना आपला जीव गमवावा लागला.
दरवर्षी असंख्य गोविंदा जखमी होतात तर काहींना मृत्यू येतो. या वर्षीही काही गोविंदांना आपला जीव गमवावा लागला. यावर्षी मुंबईत २२२ गोविंदा जखमी झालेत. त्यापैकी १९७ गोविंदावर उपचार करून त्यांना घरी आणले व २५ गोविंदा गंभीर जखमी असल्याने त्यांना अजूनही डिस्चार्ज मिळालेला नाही. मुंबईत दहीहंडीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
दरवर्षी एकच नाही तर कितीतरी गोविंदा जखमी होऊन मृत्युमुखी पडतात. गेल्या १० वर्षाच्या आकडेवारीतून परिस्थिती तुमच्या लक्षात येईल. २०१२ मध्ये २२५ गोविंदा जखमी झालेत व २ मृत्युमुखी पडले. २०१३ मध्ये ३६५ गोविंदा जखमी झालेत व २ मृत्युमुखी पडले. २०१४ मध्ये २०२ गोविंदा जखमी झालेत व १ मृत्युमुखी पडला. २०१५ मध्ये १२९ गोविंदा जखमी झालेत व १ मृत्युमुखी पडला. २०१६ मध्ये १२८ गोविंदा जखमी झालेत. २०१७ मध्ये ११७ गोविंदा जखमी झालेत व २ मृत्युमुखी पडले. २०१८ मध्ये ८५ गोविंदा जखमी झालेत व २ मृत्युमुखी पडले. २०१९ मध्ये ११९ गोविंदा जखमी झालेत. ही मुंबईतील आकडेवारी आहे. त्यानंतर दोन वर्षे कोरोनामध्ये दहीहंडी झाली नाही.
ज्या गोविंदांचा मृत्यू झाला त्यांच्या घरची स्थिती काही काळ अत्यंत दुःखद असते. एखादा गोविंदा त्याच्या आईवडिलांना एकटाच असतो व त्याचा मृत्यू होतो. म्हणजे आई वडिलांचा म्हातारपणाचा आधारच निघून जातो. यावर्षी नवनिर्वाचीत मुख्यमंत्र्यांनी गोविंदांसाठी सरकारी नोकरीत ५ टक्के आरक्षण जाहीर केले आहे. जखमी गोविंदांवर मोफत उपचार करण्याचे आदेशही दिले आहेत. जखमी म्हणजेच अवयव कामातून गेलेल्या गोविंदांना सुद्धा सरकार कडून मदत दिली जाणार आहे.
याच सरकारच्या निर्णयाबाबत अनेक टीका केल्या जात आहेत. यावर्षी मृत्यू झालेल्या एका गोविंदाच्या आईनेही म्हटलं आहे की, “मला पैश्याची मदत नको, माझा बाळकृष्ण मला परत देऊ शकत असाल तर तो द्या.” दहीहंडीच्या सातव्या थरावरून जीव गमावलेल्या गोविंदाच्या आईचा टाहो डोळ्यात पाणी आणणारा आहे. त्या आईला बाकी काहीच नको फक्त तिचा बाळकृष्ण हवा आहे. आईसाठी मुलं लहानच असतात.
ती आई म्हणाली माझा मुलगा जरी २४ वर्षाचा होता तरी तो माझा बाळकृष्णच आहे. त्याला दोन घास खायलासुद्धा वेळ नव्हता. मला म्हणाला दहीहंडी फोडून येतो आणि आता कधीच परत येणार नाही. बोलवायला आलेले गोविंदा दारात वाट बघत उभे होते. पण आता जे गेलं ते माझं गेलं कोणाच्या आईचं वा मुलाचं काहीच गेलं नाही. आता काय करतील तुमची ती लाखोंची बक्षीसं? माझं गोकुळ तर ओसाड झालंय.
अरे सत्यानाश होईल तुमच्या दहीहंडीचा, तुम्ही सगळे कौतुक करत होता म्हणून माझा मुलगा सातव्या थरावर गेला. तुमची दोन मिनिटाची मजा माझ्या बाळाचा जीव घेऊन गेली. होय माझ्या बाळाचा जीव गेलाय. सातव्या थरावरून खाली पडला आणि डोक्याला मार लागून त्याचा जीव गेला. आता कसा परत आणू त्याला. तुमच्या गोविंदाने माझा बाळकृष्ण हिरावून नेला.
बहुतेक लोकांनी मला सांगितलंय की काळजी करू नका, सरकार चांगलंय. ते तुम्हाला नुकसनाभरपाई देईल. पण काय करू ती घेऊन? ती घेऊन माझं बाळ कुठे परत येणार आहे ? त्यापेक्षा मला माझा बाळकृष्ण परत आणून द्या, म्हणावं देऊ शकतील का ते? जेव्हा तो बालवाडीत बाळकृष्णाचा पेहराव घालून जायचा तेव्हा वाटायचं हा कधी मोठा होऊच नये. तो माझा कान्हा आणि मी त्याची यशोदा माता बनून असंच राहावं. पण तो कधी मोठा होऊन गल्लीतील हंडी फोडायला लागला, दूरदूर जायला लागला मला कळलंच नाही.
‘आलोच गं आई… यंदा चार हंड्या फोडायच्या आहे. येतो फोडून असे तो सांगायचा. ‘काळजी घे रे बाळा… फार उंच चढू नकोस…’ मी सांगायचे. ‘आई, सगळे आहेत बरोबर, काही नाही होणार…’ तो सांगायचा. सगळे बरोबर होते पण कोणीच काही करू शकलं नाही. माझा बाळकृष्ण गेलाच.
यशोदा मातेचा खरा बाळकृष्ण फक्त माखनचोर होता. त्याने कधीही बक्षीस मिळावं म्हणून दहीहंडी फोडलेली नाही. आता जेवढे थर तेवढी बक्षीसं आहेत. म्हणून दरवर्षी एक एक थर वाढवला जातो. असंख्य यशोदेचे बाळकृष्ण जीव पणाला लावतात. माझ्या बाळाच्या जाण्याने माझं आयुष्यच बेरंग झालं. खूप स्वप्नं पाहिली होती त्याच्यासाठी. नुकताच तो कामाला लागला होता.
२ वर्षांनी त्याचे दोनाचे चार हात मी केले असते. त्यानंतर आणखी एकदोन वर्षात घरात नव्या बाळकृष्णाची पावलं दुडदुडली असती. नातवाला जोजवून, खेळवून, त्याची पहिली दहीहंडी बघून एक वर्तुळ पूर्ण झालं असतं आणि मी डोळे मिटायला मोकळी झाले असते… असे म्हणत त्या मातेने टाहो फोडला.
महत्वाच्या बातम्या
Politics: शिंदे गटाने वाढवलं उद्धव ठाकरेंचं टेंशन, निवडणूक आयोगाला पाठवली तब्बल दीड लाख प्रमाणपत्र
J.P. Nadda: पाकिस्तान काँग्रेसच्या मदतीने भारतावर हल्ले करत होता, भाजपचा खळबळजनक आरोप
Corona-HIV-Monkeypox : ‘या’ ठिकाणी आढळला एकाचवेळी कोरोना, एचआयव्ही आणि मंकीपॉक्स झालेला पहिला रुग्ण, उडाली खळबळ
नदी आटल्यानंतर सुकलेल्या पात्रात दिसलं ‘हे’ भयानक दृश्य; फोटो सोशल मीडियावर व्हायरल