Yashashri Munde : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप (BJP – Bharatiya Janata Party) नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या कन्यांपैकी तिसऱ्या क्रमांकाची मुलगी यशश्री मुंडे (Yashashri Munde) यांनी आता राजकारणात अधिकृत प्रवेश केला आहे. त्यांनी परळी (Parli) येथील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (Vaidyanath Urban Co-operative Bank) संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
शुक्रवार, ११ जुलै रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यादिवशी यशश्री मुंडे यांच्यासह त्यांची बहीण माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे (Dr. Pritam Munde) यांचाही अर्ज दाखल झाला. एकूण १७ जागांसाठी ही निवडणूक होत असून, शेवटच्या दिवशी एकूण ७१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
यशश्री मुंडे या यापूर्वी थेट राजकारणात सक्रीय नव्हत्या. त्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असून त्या पेशाने वकील आहेत. त्यांनी अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठातून (Cornell University, USA) शिक्षण घेतले आहे. त्या ‘प्रॉमिसिंग आशियाई विद्यार्थी’ (Promising Asian Student) म्हणूनही गौरविण्यात आल्या होत्या. कार्नेल हे जगातील अव्वल पाच विद्यापीठांपैकी एक मानले जाते आणि येथे केवळ ११ टक्के विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो.
दुसरीकडे, पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि डॉ. प्रीतम मुंडे (Dr. Pritam Munde) या दोघी बहिणी राजकारणात सक्रीय असून त्यांच्या तुलनेत यशश्री मुंडे राजकारणापासून दूर होत्या. मात्र आता बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचे ‘राजकीय पदार्पण’ घडत आहे.
या निवडणुकीसाठी अर्ज छाननी १४ जुलै रोजी होणार असून, १५ ते १९ जुलै या काळात अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. मतदान १० ऑगस्ट रोजी तर मतमोजणी १२ ऑगस्टला होणार आहे. यशश्री मुंडे यांचा हा पहिलाच निवडणूक प्रयोग असून, त्यामुळे मुंडे कुटुंबीयांच्या तिसऱ्या कन्येचे राजकीय मैदानात अधिकृत लॉन्चिंग झाल्याचे स्पष्ट होत आहे.