नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये आपली सत्ता स्थापन केली. या निवडणुकीदरम्यान, आम आदमी पक्षाने 18 वर्षांवरील महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, ते आश्वासन आता पूर्ण करण्यात येणार असल्याच्या चर्चा होत आहेत.
पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान आम आदमी पक्षाने सरकार स्थापन झाल्यास 18 वर्षांवरील महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. आता ते आश्वासन भगवंत मान यांचे पंजाब सरकार लवकरच पूर्ण करण्याची शक्यता आहे.
पंजाबच्या महिला आणि बालकल्याण मंत्री डॉ बलजीत कौर यांनी हे आश्वासन सरकार पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे. त्या म्हणाल्या, राज्यातील महिलांची स्थिती सुधारण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही आमच्याकडून दिलेली वचने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तसेच निवडणुकीदरम्यान सरकारने जे आश्वासन दिले होते, त्याप्रमाणे आम्ही 18 वर्षांवरील प्रत्येक महिलेला दरमहा एक हजार रुपये लवकरच देऊ करणार आहोत, असे त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी सांगितले की, राज्य सरकार महिला संरक्षण कायद्यात आणखी कडक व्यवस्था जोडणार आहे. त्यामुळे महिलांशी संबंधित अधिकार वाढतील.
दरम्यान, पंजाब सरकारने घेतलेल्या या निर्णयावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पंजाबवरील आपली सत्ता गमावणाऱ्या काँग्रेसने हे प्रश्न केले आहेत, निवडणूकीच्या वेळी आम आदमी पक्षाने महिलांना एक हजार रुपये देण्याचे आश्वासन तर केले मात्र, हे पैसे ते कुठून आणणार? असा सवाल केला.
दरम्यान, गेल्या महिन्यात पंजाब सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली होती. पंजाब सरकारने 1 जुलै 2022 पासून सर्वांसाठी वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे. निवडणुकीच्या दरम्यान, आपने सत्ता आल्यास प्रत्येक घराला 300 युनिट वीज मोफत दिली जाणार असल्याचं आश्वासन दिलं होतं, जे आता जुलै पासून अंमलात आणले जाणार आहे.