नाशिक फाटा ते राजगुरूनगर या 28 किलोमीटर लांबीच्या मार्गावर संपूर्ण उड्डाणपूल करण्यात येणार आहे. या उड्डाणपूलाचे काम झाले तर, नाशिक फाटा ते राजगुरूनगर हे अंतर केवळ 20 मिनिटात पूर्ण करता येईल. महत्वाचे म्हणजे मार्गावर असणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सुटका होईल.
या कामासाठी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. नितीन गडकरी यांनी देखील हा 28 किलोमीटरचा मार्ग सहा लेनचा दुमजली उड्डाणपुल करून 12 लेनचा करण्यासाठीच्या सूचना दिल्या आहेत.
माहितीनुसार, नाशिक फाटा ते राजगुरूनगर या रस्त्याचे काम दोन टप्प्यात होणार असून, पहिला टप्पा नाशिक फाटा ते मोशी टोल नाका असे होणार आहे. तर दुसरा टप्पा मोशी टोल नाका ते चांडोली टोल नाका, असे करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
चाकण परिसरातील वाढते औद्योगीकरण यामुळे दरवर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहनांची संख्या वाढत आहे. सध्या राजगुरुनगर ते नाशिक फाटा अंतर पार करण्यासाठी सुमारे अडीच ते तीन तास एवढा वेळ लागतो. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
मात्र हा संपूर्ण मार्ग एलिव्हेटेड (उड्डाणपूल) केल्यास हे अंतर केवळ 20 मिनिटात पूर्ण करता येणार आहे. आमदार महेश लांडगे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाल्यास पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसराच्या वैभवात भर पडेल. तसेच वाहतूक कोंडी सुटेल.
पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडीसाठी हा अत्यंत चांगला पर्याय असून, यामुळे 12 लाइन रस्ता व शक्य असल्यास त्याच पिलरमधून 13 वीलेन मेट्रो लाइन होऊ शकते. यापूर्वी नागपूर-वर्धा रस्त्यावरती 12 किलोमीटरमध्येही हा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला असून, नागपूर मध्ये 12 लेन रस्ता आणि त्यावरून मेट्रो हा प्रकल्प गेल्यावर्षीच कार्यान्वित झाला.