Share

भक्तगणांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी उभारणार भव्य दिव्य तिरुपती बालाजी मंदिर

तिरुपती बालाजीच्या ज्या भक्तांना आंध्र प्रदेश इथे जाऊन बालाजीचे दर्शन घेता येत नाही, त्यांच्यासाठी महाराष्ट्रातच भव्य दिव्य तिरुपती बालाजी मंदिर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 10 एकर जागेस मंत्रिमंडळाने मंजुरी देखील दिली आहे. त्यामुळे आता भक्तगणांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

माहितीनुसार, महाराष्ट्रात तिरुपती बालाजी मंदिर नवी मुंबईत उभारण्यात येणार आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हाकेच्या आंतरावर ‘उलवे’ इथे दहा एकर जागेवर हे मंदिर साकारण्यात येणार आहे. या मंदिराच्या 10 एकर जागेस आता मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली आहे.

शिवसेनेने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच तिरुमला तिरुपती मंदिराचे विश्वस्त मिलिंद नार्वेकर यांनी देखील ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंचे आभार मानले आहेत.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 2 एप्रिलला सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत तिरुमला तिरुपती देवस्थानमला या मंदिरासाठी जमीन देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता. तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी आणि मंत्री अदित्य ठाकरे हे या बैठकीत उपस्थित होते.

https://twitter.com/ShivsenaComms/status/1516798643885383683?t=ixLy1wb8O_o5XDk2LfR-LA&s=19

27 फेब्रुवारी 2022 रोजी तिरुपती तिरुमला देवस्थानमचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी यांनी जमीन वाटपासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंदिरासाठी सिडकोला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ योग्य जागा शोधण्याचे निर्देश दिले होते.

दरम्यान, यंदा तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराच्या विश्वस्तपदी महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव आणि विश्वासू नार्वेकरांना ही संधी मिळताच, त्यांनी आता महाराष्ट्रात तिरुमला तिरुपती मंदिर उभारण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसून येत आहे.

राज्य राजकारण

Join WhatsApp

Join Now