Share

Supriya sule : शिंदेंच्या मदतीला जाणे शीतल म्हात्रेंना पडणार महागात; राष्ट्रवादीने दाखवला चांगलाच हिसका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीत त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे बसलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीत बसून श्रीकांत शिंदे कारभार करत असल्याचा राष्ट्रवादीकडून आरोप करण्यात आला होता.

राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा हा फोटो ट्विट केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलेच धारेवर धरले. काल दिवसभर यावरुन आरोप प्रत्यारोप झाले.

त्यानंतर, या प्रकरणावर श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं, तेव्हा हे प्रकरण थंड होईल असं वाटत असतानाच शिंदे गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांनी केलेल्या एका ट्विटमुळे पुन्हा एकदा हे प्रकरण तापलं. म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या मविआ सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा दावा करुन तसा फोटो ट्विट केला.

शीतल म्हात्रे यांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादीने आक्रमक होत तो मॉर्फ केलेला फोटो आहे. असा फोटो ट्विट केल्याबद्दल शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांची माफी मागावी नाहीतर आम्ही कायदेशीर कारवाई करु, असा आक्रमक पवित्रा राष्ट्रवादीने घेतला आहे.

दरम्यान, बंडखोरांना दांड्याने मारण्याची भाषा करणाऱ्या शीतल म्हात्रे यांनी अचानक भूमिका बदलून नुकतेच शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी सातत्याने ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेऊन शिवसेनेला झोडण्याचं काम सुरू केलं.

त्यात काल श्रीकांत शिंदेंचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी श्रीकांत यांच्या मदतीला धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्याच प्रयत्नात विरोधकांना उत्तर म्हणून त्यांनी सुप्रिया सुळे मागील वर्षी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा दावा करुन तसा फोटो ट्विट केला.

‘कोण कुणाच्या खुर्चीत बसलंय, बघा तुम्हीच…’ असं कॅप्शन देऊन सुप्रिया सुळे यांचा तो फोटो शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. शीतल म्हात्रे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली. आता म्हात्रे यांच्यावर कोणती कारवाई होईल पाहावं लागेल.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now