Share

जायचं तर जा पण उगच टिव्हीसमोर रडण्याचं ढोंग करू नका; ठाकरेंनी कदमांना सुनावले

रामदास कदम यांची काल शिवसेनेनी हकालपट्टी केल्यावर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरेंचे काही निर्णय चुकले म्हणत अश्रू ढाळले. त्यानंतर, नुकतीच उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत झूम मिटिंग घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे माजी नेते रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला.

सध्या शिंदे गटात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अशावेळी, उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत झूम मिटिंग घेऊन संवाद साधला. यावेळी माध्यमांसमोर शिवसेनेबद्दल बोलताना अश्रू अनावर झालेल्या रामदास कदम यांना ‘रडण्याचे ढोंग करू नका’ असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले, आमदार-खासदारांना मी देखील डांबून ठेऊ शकतो. पण याला लोकशाही म्हणायचं का? तुम्ही मनाने तिकडे गेले असाल तर मी किती दिवस तुम्हाला डांबून ठेवू शकतो. मी गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना भेटतोय. त्यांना सगळ्यांना सांगितलंय, ज्यांना जायचं त्यांनी जरूर जा, पण नाटकं करुन जाऊ नका.

तसेच म्हणाले, उगाचच टीव्ही समोर जाऊन रडण्याचं ढोंग करू नका. शिवसेनेच्या विरोधात कारवाया करायच्या त्या तुम्ही केल्या. आतापर्यंत जे जे मिळालं ते आनंदाने भोगलं ना, मग टीव्हीसमोर रडण्याचं ढोंग कशाला? असे म्हणत उद्धव ठाकरेंनी रामदास कदमांना सुनावलं.

तसेच, तुम्ही मागितलं तर मी काहीही देईन पण हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, मी बाळासाहेबांचा पुत्र आहे तुमच्या हाताला काही लागू देणार नाही. असं म्हणत ठाकरेंनी येत्या आठ दिवसांत जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या.

दरम्यान, रामदास कदम यांची शिवसेनेने हकालपट्टी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते माध्यमांसमोर ढसाढसा रडले. उद्धव ठाकरेंचे काही निर्णय चुकले, असं सांगत बाळासाहेब ठाकरे आज असायला हवे होते, असे रामदास कदम म्हणाले.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now