नामिबियातून आणलेल्या चित्त्यांवरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाची मालिका चालू आहे. विरोधक केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील केंद्र सरकारला टोला लगावला आहे.
जयंत पाटील यांनी चित्त्यांना देण्यात येणाऱ्या आहारावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. जयंत पाटील म्हणाले, चित्त्यांना खाण्यासाठी जिवंत काळवीट सोडणं ही क्रूरता आहे. इतर प्राणी संग्रहालयात जो आहार दिला जातो, तोच द्यायला पाहिजे. मात्र, त्याऐवजी भारतीय काळवीट जिवंतपणे चित्त्यांसमोर खायला ठेवता, हे चुकीचं आहे असे पाटील म्हणाले.
अजित पवार यांनी देखील यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. म्हणाले, दुर्दैवाने, महाराष्ट्रात जे महत्त्वाचे प्रश्न असतात, त्याला व्यवस्थित बाजूला ठेवून तिसरेच प्रश्न पुढे आणले जातात. चित्ते आले ठिक आहे, पण यातून रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का? याने वेदांताचा प्रश्न सुटणार आहे का?असा सवाल अजित पवार यांनी केला.
दरम्यान, काल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील केंद्र सरकारवर यावरून निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे म्हणाले, अनेक वर्षांनी आपल्या देशामध्ये चित्ता हा प्राणी आला आहे. मराठीमध्ये आपण त्याला चित्ता बोलतो आणि इंग्लिशमध्ये चिता बोलतात. आम्ही पेंग्विन आणले म्हणून ते आम्हाला पेंग्विन सरकार म्हणतात. मग आम्ही त्यांना चित्ता सरकार म्हणायचे का? असा खोचक टोला ठाकरेंनी लगावला.
माहितीनुसार, काळवीटाला बिश्नोई समाजात महत्त्वाचे स्थान आहे. चित्त्यांना शिकारीसाठी सोडण्यात आलेल्या प्राण्यांमध्ये काळवीटांचादेखील समावेश आहे. ही कृती चुकीची असल्याचे बिश्नोई समाजाने पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. हरियाणातील काही भागांमध्ये या समाजाकडून आंदोलनही करण्यात येत आहे.
भारतातून नामशेष झालेले चित्ते जवळपास ७० वर्षांनंतर भारतात परतले आहेत. १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी नामिबियातून आठ चित्ते भारतात विशेष विमानाने आणण्यात आले आहेत. हे चित्ते सध्या मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात आहेत. या चित्त्यांना देण्यात येणाऱ्या आहारावरून सध्या राजकारण तापलं आहे.